Tukaram Mundhe : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? पाहा काय आहे तुकाराम मुंढेंची इच्छा, मनातलं सगळं बोलून गेले..
पुण्यामध्ये आयोजित रोटरी रोटारॅक्ट फेस्टिवलला तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना मुंढे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. तसेच मुलांचं संगोपन कसं करावं? याबद्दल पालकांना देखील मार्गदर्शन केलं आहे.

सध्या एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच चर्चेमध्ये आहेत. एफडीएचा पदभार स्विकारल्यापासून त्यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी आतापर्यंत कारवाई केली आहे. दरम्यान पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रोटरी रोटारॅक्ट फेस्टिवलला तुकाराम मुंढे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना देखील मार्गदर्शन केलं आहे. दिवसातले 8 ते 10 तास काम करतो म्हणजे करिअर असे नाही, तो आपल्या जिवनाचा भाग असतो, पुर्ण करिअर नसते. तुम्ही या व्यतिरिक्त लिड कसे करतात? हे तुमचे करिअर आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थी तसेच पालकांना देखील मार्गदर्शक केलं आहे. जेव्हा तुमचा मुलगा 10 वी किंवा 12 वी ला असतो, तेव्हा त्याच्याकडून फार अपेक्षा करणं सोडून द्या. मी स्वत: कधी 60, 70 टक्क्यांच्या पुढे गेलो नाही. मात्र त्यामुळे माझे करिअर कधीही थांबले नाही. मार्कांवर करिअर ठरत नाही. फॉर्मर शिक्षणावर सर्व काही ठरत नाही. काही पिएचडी आहेत पण त्यांना शिकवता येत नाही. मार्कवर सर्वकाही ठरत नाही. मार्कांसाठी मुलांवर प्रेशर टाकणं टाळलं पाहिजे, असं यावेळी तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आपल्या मुलांना आपण सांगतो मोबाईल वापरु नको, आणी त्याच वेळी आपल्या हातात मोबाईल असतो. तुम्ही काय आहात? या पेक्षा तुम्ही कसे वागतात त्याचे अनुकरण नवी पिढी करत असते. आपल्याला या प्रश्नांची उत्तर शोधायची आहेत, असंही यावेळी मुंढे यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला मुख्यमंत्री बनायला आवडेल का? असा प्रश्नही यावेळी मुंढे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुंढे यांनी म्हटलं की, 2010 ला सोलापूरवरून मुंबईत बदली झाली तेव्हा कोणी तरी मला विचारलं होतं की एफडीएचे आयुक्त व्हायला आवडेल का? तर मी तुम्हाला सांगतो, मी विश लिस्टवर जगणारा माणूस नाही. मी जे खरं आहे, त्यावर विश्वास ठेवतो. मी वर्तमान काळात जगतो, सध्या तुमच्या हातात जी भूमिका आहे, आधी ती पार पाडा. बाकी पुढे काय? ही वेळच ठरवेल असं मुंढे यांनी म्हटलं आहे.