
अभिनेता सैफ अली खान याच्या घरात 15 जानेवारीच्या मध्यरात्री एक चोर घुसला आणि त्याने सैफवर हल्लाही केला. याप्रकरणानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडलं. अखेर तीन दिवसांनी 19 जानेवारी रोजी ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून मूळ आरोपी मोहम्मद शरीफुलला ताब्यात घेण्यात आलं. मात्र त्यापूर्वी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं, पण तो मूळ आरोपी नसल्याचे तपासात उघड झाल्यान पोलिसांनी त्याला सोडून दिलं. मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे त्या तरूणाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. त्याची नोकरी सुटली, ठरलेलं लग्न मोडलं आणि अवघ्या काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आकाश कनोजिया (वय 31) असे त्या तरूणाचे नाव असून त्याच्या आयुष्याची वाताहत झाली आहे. मात्र या घटनेचा फटका फक्त त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही बसला आहे.
मुलाचे हाल पाहून आकाशचे वडीलही अस्वस्थ झाले आहेत. 19 जानेवारीला सैफच्या मूळ हल्लेखोराला अटक झाली आणि आकाश कनोजियाची सुटका झाली. त्याला पोलिसांनी छत्तीसगडच्या दुर्गमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर त्याची सुटका झाली तर नोकरी गेल्याने तो निराश झाला आहे. त्यातच त्याच्या होणाऱ्या बायकोनेही लग्न मोडल्याने त्याच्या दु:खात आणखीनच भर पडली. त्याच्यावर जी दुर्दैवी वेळ आली आहे, त्यामुळेही घरचेही दुखावले आहेत. आकाशचे वडीलही दु:खी असून मुलासाठी हळहळत आहेत. ” माझ्या मुलाचे लग्न तुटले, त्याला कोणी नोकरी देत नाहीये. मुंबई पोलीसांनी आपली चूक कबूल करावी, त्याच्याबद्दल माहिती द्यावी अशी त्यांची मागणी आहे. माणुस कसाही जगू शकतो परंतु बदनामीमुळे जगू शकत नाही. त्या घटनेचा मुलावर परिणाम… माझा मुलगा बिथरलाय. त्याचं दु:ख त्याला माहित आहे, तो आमच्यासोबतही नीट बोलत नाही” असं सांगत त्याच्या वडिलांनी दु:ख व्यक्त केलं.
माझा मुलगा आकाश त्या दिवशी कल्याणला ट्रेनमध्ये बसून बाहेरगावी जात होता. पण त्याला दुर्ग स्टेशनवर आर पी एस अधिकाऱ्यांनी थांबवलं आणि खाली उतरवलं. तेथे मुंबई पोलिस आले आणि त्यांनी त्याची 8-10 तास चौकशी करण्यात आली. मात्र आकाश हा तो हल्लेखोर नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं, मग त्यांनी त्याला सोडून दिलं. पण या घटनेचा त्याच्यावर परिणाम झाला आहे.
पोलिसांनी त्यांच काम केलं, चौकशी केली पण आता त्यांनी त्याची मदत केली पाहिजे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी केल्यामुळे आता माझ्या मुलाला कोणी कामावर ठेवत नाही. मुंबई पोलीस जे करत होते, ते योग्य आहे परंतु निट फोटो पाहिला पाहिजे, हा तोच आरोपी आहे का याची खातरजमा केली पाहिजे. माझ्या मुलासोबत जे घडलं ते चुकीचे झालं आहे. या घटनेचा, पोलिसांच्या वागण्याचा त्याच्यावर परिणाम झाला आहे, त्याचं मन लागत नाही, तो बिथरला आहे. त्याचं दु:ख काय आहे ते त्यालाच माहीत. तो आमच्याशी सुद्धा नीट बोलत नाही. अनेक जण हेच सांगत होते की, फोटो मधील व्यक्ती आणि माझ्या मुलात कुठेच साधर्म्य नाही.असे म्हणत आकाशच्या वडिलांनी त्यांचा संताप व्यक्त केला. त्यांची ही कैफियत आता कोण ऐकणार का ? आकाशचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य कधी सुरळीत होणार ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.