
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख 16 ते 21 जानेवारी दरम्यान असणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. मतदान 5 फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी 7 फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 50 टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे. त्यात निवडणूक होणार आहे. एकूण 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीतींसाठी निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरं मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया महापालिकेसारखीच ऑफलाईन असेल. ज्या जागा राखीव आहेत. त्याठिकाणी जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. निवडून आल्यावर सहा महिन्यात जातप्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही दिलं तर त्याची निवड रद्द होईल.
या निवडणुकीसाठी 25 हजार 482 मतदान केंद्र असतील, ही निवडणूक ईव्हीएमने होणार आहे. 22 हजार कंट्रोल युनिट, 1 लाख 10 हजार बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. 25 हजार 482 मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी शौचालय असेल. काही पिंक मतदान केंद्र असतील जी महिला मतदारांसाठी असतील. तर काही आदर्श मतदार केंद्रे देखील असणार आहेत.