काँग्रेसचं ठरलं..! या नेत्याकडेच पक्षाची धुरा सांभाळण्यास देणार…

काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची तयारी सुरु असताना त्याआधीच आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचं ठरलं..! या नेत्याकडेच पक्षाची धुरा सांभाळण्यास देणार...
| Updated on: Sep 19, 2022 | 7:43 PM

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्ष (Congress President) पदासाठी निवडणुकीची तयारी सुरु असताना त्याआधीच आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल गांधींना (Rahul Gandhi) बसवण्यासाठी 7 राज्यातील (Seven State) काँग्रेस समितीने त्यासाठी ठराव पास केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 7 राज्यांच्या काँग्रेस समितीने राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठीचा हा प्रस्तावही या राज्यांनी पास केला आहे. 24 सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

त्याआधीच या गोष्टीला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पक्षाची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधींच्या हाती येणार हेच पक्के झाले आहे.

मागील 2017 मध्येही याच प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला होता, त्यानंतर राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले होते. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर मात्र त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता होणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष पदासाठी राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्रासह 7 राज्यांनी राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचा ठराव पास करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वीच छत्तीसगड प्रदेश काँग्रेसकडूनही राहुल गांधींच्या नावासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. तर त्याआधी राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीने असे दोन ठराव पारित केले होते.

या महिन्याच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी नकार देत गांधी घराण्याबाहेरच्या नेतृत्त्वासाठीही त्यांनी आग्रह धरला होता.

नुकत्याच कन्याकुमारी येथे झालेल्या एका परिषदेत या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “मी अध्यक्ष होणार की नाही, हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले होते.”