
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 ठिकाणं उद्ध्वस्त झाले, तसेच या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढला, पाकिस्तानकडून देखील भारतावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, या हल्ल्यासाठी पाकिस्तानने जे ड्रोन वापरले होते ते तुर्कीचे होते. भारत पाकिस्तान वादात तुर्कीनं पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान पाकिस्ताननंतर आता भारतानं तुर्कीच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये बायकॉट तुर्की अभियानाला सुरुवात झाली आहे. एकीकडे पुण्यापासून ते राजस्थानच्या जयपूर पर्यंतच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या मालावर बहिष्कार घातला आहे. तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार घालण्यात आला आहे. भारतामधून दरवर्षी लाखो पर्यटक तुर्कीला जातात, मात्र आता पर्यटकांनी देखील तुर्कीकडे पाठ फिरवली आहे.
दुसरीकडे तुर्कीला आणखी एक धक्का बसला आहे, तो म्हणजे भारतीय व्यापाऱ्यांसोबतच आता इंडियन फिल्म इंडस्ट्रीकडून देखील तुर्कीला मोठा धक्का देण्यात आला आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियशनकडून (AICWA) चित्रपट आणि मालिकांचं तुर्कीमधील चित्रिकरण बॅन करण्यात आलं आहे. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीमध्ये आता या नंतर एकाही चित्रपटाचं अथवा मालिकेचं चित्रिकरण होणार नाही, अशी भूमिका ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियशनकडून घेण्यात आली आहे.
तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला याची त्यांना आता फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. तुर्कीवर बहिष्काराचं आस्त्र उगारण्यात आलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुर्कीवर बहिष्कार घालण्यात येत आहे. यामध्ये बॉलिवूड देखील मागे नाहीये, इथून पुढे तुर्कीमध्ये कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण होणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे, सोबतच तुर्कीच्या सर्व प्रकारच्या प्रोडक्शन हाऊसवर देखील बंदी घालण्यात आली आहे, याचा तुर्कीला मोठा फटका बसणार आहे. तुर्कीच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळण्यात आल्या आहेत.