What India Thinks Today: अग्निवीर कार्यकाळ संपल्यावर विद्यार्थ्यांना देणार फिटनेसचे धडे? शिक्षक म्हणून संधी, अनुराग ठाकूर यांचं मोठं वक्तव्य

TV9 च्या ग्लोबल समिटमध्ये आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती व प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी संवाद साधला त्यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.

What India Thinks Today: अग्निवीर कार्यकाळ संपल्यावर विद्यार्थ्यांना देणार फिटनेसचे धडे? शिक्षक म्हणून संधी, अनुराग ठाकूर यांचं मोठं वक्तव्य
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
| Updated on: Jun 18, 2022 | 5:22 PM

नवी दिल्ली : TV9 च्या ग्लोबल समिटमध्ये (Global Summit) आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय माहिती व प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी संवाद साधला. यावेळी ते क्रीडा (Sports), खेळाडूंसाठी असलेल्या विविध योजना, युवक कल्याण अशा अनेक विषयांवर बोलले. केंद्र सरकारकडून नुकतीच तरुणांसाठी अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. या योजनेबाबत देखील मोठं वक्तव्य अनुराग ठाकूर यांनी केले आहे. अग्निपथ योजनेबाबत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, हा मोदी सरकारचा एक ऐतिहासिक निर्णय आहे. जेव्हा हे अग्निवीर भारतीय सेनेमध्ये चार वर्षांचा कार्यकाळा पूर्ण करणार तेव्हा त्यांना वेतनाच्या स्वरुपात 20 ते 25 लाख रुपये मिळणारच आहेत. सोबतच अतिरिक्त 11 लाख रुपये मिळतील. मी असा विचार करत आहे की, जेव्हा हे अग्निवीर सेनेमध्ये आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील तेव्हा त्यांना ट्रेनिंग देऊन सध्या देशात 15-16 लाख रिक्त असलेल्या शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या जागेवर भरती केल्या जाऊ शकते. यावर विचार सुरू असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.

 

‘जगाचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोण बदलला’

पुढे बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, जगाचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोण बदलत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे योगा हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला संपूर्ण जगाने प्रतिसाद दिला. 21 जून रोजी संपूर्ण जग आज योग दिवस साजरा करताना दिसत आहे. खेळाबाबत बोलायचे झाल्यास कोरोना काळात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. कोरोना काळात खेळाडूंना ट्रेनिंग देणे शक्य नव्हते. मात्र तरी देखील आम्ही हार मानली नाही. याचाच परिणाम म्हणून टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताने सर्वाधिक मेडल जिंकले आपण तब्बल 121 वर्षानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये मेडल जिंकल्याचे ते म्हणाले.

तरुणांना शांत राहण्याचे आवाहन

एक खेळाडू घडवण्यासाठी कमीत कमी आठ ते नऊ वर्षांचा कालावधी लागतो. पुढील दहा वर्षांत भारताचा समावेश हा ऑलिंपिकमधील टॉप टेन देशांमध्ये करण्याचे आमचे उद्दष्ट आहे. त्या पातळीवर सर्व तयारी सुरू असल्याचे देखील यावेळी अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. खेळाडूंना प्रोहात्साहन देण्यासाठी त्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे देखील यावेळी अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे. तसेच सध्या देशात अग्निपथ योजनेवरून गोंधळ सुरू आहे. याबाबत बोलताना अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, मी तरुणांना आवाहन करतो त्यांनी चुकीचा मार्ग निवडू नये. जाळपोळीच्या प्रकाराने प्रश्न सुटणार नाहीत. चर्चेतून मार्ग निघू शकतो.