
अहमदाबादमधून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याने तब्बल 265 लोकांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवासी तर 24 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. यामुळे विमानाला आग लागली. या विमानात २३० प्रवासी, २ पायलट आणि १० कर्मचारी होते. या भीषण दुर्घटनेत १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा मृत्यू झाला. केवळ एक प्रवासी बचावला.
या विमान अपघातानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. एफएसएलसह इतर एजन्सींकडूनही कसून तपासणी सुरू आहे. एटीएसकडून या अपघाताची चौकशी सुरु असून त्यांना विमानाचा महत्त्वाचा भाग असलेला डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर (डीव्हीआर) सापडला आहे. ज्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) असेही म्हणतात. त्यामुळे आता नेमका अपघात का आणि कसा झाला याचा संपूर्ण उलगडा झाला आह.
डीव्हीआरच्या तपासणीतून अपघाताबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी अमेरिकन एजन्सीही मदत करणार आहे. विशेषतः बोईंग विमानाशी संबंधित तांत्रिक बाबींची तपासणी केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे.
सीव्हीआर हे एक लहान, मजबूत इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे विमानाच्या कॉकपिटमध्ये येणाऱ्या सर्व आवाजांची नोंद करते. याला ‘ब्लॅक बॉक्स’चा एक भाग मानले जाते. विमान अपघात झाल्यास संपूर्ण अपघाताची चौकशी करण्यास ते मदत करते.
सीव्हीआरमध्ये विमानाच्या कॉकपिटमधील पायलट, सह-वैमानिक आणि इतर फ्लाइट क्रू सदस्यांमधील संभाषणे रेकॉर्ड केली जातात. विमान प्रणालींमधून येणारे आवाज आणि इतर संबंधित आवाजही यात रेकॉर्ड केले जातात. एखादा अपघात झाल्यास त्या अपघाताची कारणे शोधण्यात हे रेकॉर्डिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तपासकर्त्यांना अपघाताच्या वेळी विमानाच्या प्रणालींबद्दल आणि क्रू सदस्यांनी काय केले, याची माहिती देतो. सीव्हीआर सहसा विमानाच्या मागील बाजूस असते.
हे एक डिजिटल ऑडिओ रेकॉर्डर म्हणून काम करते. जे ध्वनी रेकॉर्ड करते आणि साठवते. सीव्हीआर रेकॉर्डिंगमधून अपघाताच्या वेळी विमानात काय घडत होते, याची सविस्तर माहिती मिळते, ज्यामुळे अपघाताची कारणे शोधण्यास मदत होते. अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे.