अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संगीत दिग्दर्शक बेपत्ता; शेवटचं लोकेशन फक्त 700 मीटर दूर

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महेशचे कुटुंबीय विविध रुग्णालय, पोलीस ठाणे आणि अपघातस्थळी त्याची चौकशी करत आहेत. पण कुठूनच त्याच्याविषयी अपडेट समोर आली नाही. महेशच्या स्कूटरचाही शोध घेतला जात आहे. परंतु अद्याप त्याची स्कूटरसुद्धा पोलीस किंवा कुटुंबीयांच्या हाती लागली नाही.

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संगीत दिग्दर्शक बेपत्ता; शेवटचं लोकेशन फक्त 700 मीटर दूर
Air India plane crash site
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2025 | 10:54 AM

एअर इंडिया विमान अपघातात प्राण गमावलेल्या कुटुंबीयांचं दु:ख शब्दांत मांडता येण्यासारखं नाही. या अपघातात अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. डीएनए तपासणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. अशातच 34 वर्षीय महेश कालावाडियाचे कुटुंबीयसुद्धा त्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. महेश म्युझिक अल्बमचं दिग्दर्शन करायचा. तो त्या एअर इंडियाच्या विमानातही नव्हता किंवा ज्या हॉस्टेलवर ते विमान कोसळलं होतं, त्यातही तो नव्हता. त्या घटनेपासून तो बेपत्ता असून त्याचे कुटुंबीय रुग्णालय, शवगृह आणि पोलीस ठाण्यात त्याच्याविषयी सतत चौकशी करत आहे. महेश त्याच्या स्कूटरवर घरी निघाला होता. अद्याप त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याविषयी किंवा त्याच्या स्कूटरविषयी कोणतीच माहिती मिळाली नाही. महेशचे कुटुंबीय त्याच्याबद्दल चिंतेत असण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन हे बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलपासून 700 मीटरवर दाखवलं गेलं होतं. त्यानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाला होता. याच मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं.

महेशचा छोटा भाऊ कार्तिक याविषयी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाला, “तो गुरुवारी दुपारी 1.10 वाजताच्या सुमारास पत्नी हेतलशी फोनवर बोलला होता. लॉ गार्डनजवळील मिटींग संपल्याची माहिती त्याने पत्नीला दिली होती. फोनवर दोघांची थट्टामस्करीही झाली होती. त्यानंतर नरोडा इथल्या निवासस्थानाकडे निघत असल्याचं त्याने हेतलला सांगितलं होतं.” फोन केल्याच्या तासाभरानंतरही महेश घरी न परतल्याने हेतलने त्याचा नंबर डाएल केला. तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ असल्याचं समजलं. हेतलने त्याला सतत फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर स्वीच ऑफच येत होता.

हेतलला जेव्हा विमान दुर्घटनेविषयी समजलं, तेव्हा तिने लगेचच कार्तिकला फोन केला. “महेशबाबत चिंताग्रस्त असतानाही मला वाटलं की यात काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. कारण जिथे ही घटना घडली होती, तिथून त्याचा जाण्याचा मार्गच नाही. परंतु पोलिसांकडे चौकशी केल्यानंतर भावाच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलपासून 700 मीटर अंतरावर दाखवलं. पोलिसांनी सांगितलं की मोबाइलचा डेटा अचूक स्थान दाखवत नाही, त्यामुळे कदाचित तो दुर्घटनास्थळाच्या जवळही असावा”, असं कार्तिकने पुढे सांगितलं. तो नेहमीचा मार्ग नसतानाही महेश तिथून का गेला असावा, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला आहे. त्यांनी जवळच्या सर्व रुग्णालयांमध्ये त्याच्याविषयी चौकशी केली. परंतु महेश अद्याप बेपत्ताच आहे.