
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोभाल भारतीय गुप्तहेर व्यवस्थेतील एक महत्त्वाचं नाव आहे. त्यांचं शौर्य आणि राजनैतिक कौशल्याचं आजही उदाहरण दिलं जातं. पण त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी अनेकांना माहीत नाही. हा किस्सा पाकिस्तानातील आहे. अजित डोभाल हे पाकिस्तानात आयबीचे अंडरकव्हर एजंट म्हणून कार्यरत होते. सात वर्ष ते पाकिस्तानात मुसलमान बनून राहत होते. एकदा तर ते भयंकर अडचणीत सापडले होते. त्यांच्या एका छोट्या चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं असतं.
अजित डोभाल यांनी एका कार्यक्रमात या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत हा किस्सा कुणालाच माहीत नव्हता. या घटनेतून त्यांचं साहस किती मोठं होतं हे दिसून येतं. तसेच त्यांचा हजरजबाबीपणा आणि चतुराई सुद्धा अधोरेखित होते. पाकिस्तानसारख्या शत्रू देशात सात वर्ष राहणं ही छोटी गोष्ट नव्हती आणि त्याची किंमतही मोठी मोजावी लागली असती.
अजित डोभाल हे भारतीय पोलीस सेवेच्या केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी आयबीमध्ये दीर्घकाळ काम केलंय. 2004 -2005मध्ये ते महासंचालक बनले. त्यापूर्वी त्यांनी एक वर्ष पाकिस्तानमध्ये मुसलमान बनून आयबीचा अंडर कव्हर एजंट बनून सेवा दिली. त्यानंतर इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोगात सहा वर्ष अधिकारी बनून राहिले.
अजित डोभाल यांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला. एकदा लाहोरच्या एका मोठ्या मशिदीजवळून जात होतो. तेव्हा एका मौलानाने मला पाहिलं आणि तू हिंदू आहेस का? असं विचारलं. या प्रश्नाने मी आश्चर्यचकीत झालो. पण मी लगेच उत्तर दिलं, नाही, मी मुसलमान आहे, असं डोभाल यांनी सांगितलं.
त्यानंतर मौलानाने पुन्हा जवळ बोलावलं आणि म्हटलं तू हिंदू आहेस. त्यावर मी सांगितलं नाही, मी मुसलमान आहे. त्यानंतर डोभाल यांनी असं विचारण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा मौलाना त्यांना मशिदीच्या एका खोलीत घेऊन गेले आणि तुझ्या कानाला छिद्र आहे. त्यामुळे तू हिंदू असल्याचं उघड झालंय. तू पकडला गेलास असं सांगितलं.
या परिस्थितून मी कसा तरी बाहेर पडलो होतो. त्यावर डोभाल म्हणतात, मी त्यांना सांगितलं मी धर्मांतर केलंय. त्यावर मौलानाने मला कानाची प्लास्टिक सर्जरी करण्यास सांगितलं. यावेळी चर्चा करताना मौलानानेही मोठा खुलासा केला. ते म्हणाले, मीही हिंदू आहे. माझं संपूर्ण कुटुंब मारलं गेलं. त्यामुळे मला माझी ओळख लपवून राहावं लागलं. त्यानंतर मौलानाने कपाट खोलून डोभाल यांना दुर्गा आणि महादेवाच्या मूर्त्याही दाखवल्या. या मूर्त्यांची मी रोज पूजा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या घटनेनंतर अजित डोभाल यांनी कानाची प्लास्टिक सर्जरी केली. आपली ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांनी ही सर्जरी केली. पण या अनुभवानंतरही ते घाबरले नाही. त्यांनी देश सेवा सुरूच ठेवली. त्यानंतरही डोभाल यांनी अनेक गुप्तहेरीच्या कामांमध्ये भाग घेतला. त्यांनी 1988मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर, इराकमधून 46 भारतीयांना सुरक्षितपणे आणणं, 2015 मध्ये म्यानमारमध्ये ऑपरेशन हॉट परस्यूट, पीएफआयच्या विरोधात अभियान आणि इतर अनेक मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांना मॉडर्न चाणक्यही म्हटलं जातं.