Anant Shastra: आता पाकिस्तानची खैर नाही, भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होणार ‘अनंत शस्त्र’

भारतीय लष्कराने अनंत शास्त्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी सरकारी मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीला सुमारे ₹30,000 कोटी किमतीची निविदा जारी केली आहे.

Anant Shastra: आता पाकिस्तानची खैर नाही, भारतीय सैन्याच्या ताफ्यात सामील होणार अनंत शस्त्र
Anant Shastra
| Updated on: Sep 27, 2025 | 3:18 PM

भारतीय सैन्याची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता भारतीय लष्कराने देशात स्वदेशी शस्त्रांना प्रोत्साहन महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्कराने अनंत शास्त्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी सरकारी मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीला सुमारे ₹30,000 कोटी किमतीची निविदा जारी केली आहे. यामुळे आगामी काळात भारतीय लष्कराची हवाई संरक्षण प्रणाली आणखी मजबूत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात भारतीय हवाई संरक्षण प्रणालीची ताकद आणखी वाढणार आहे. अनंत शस्त्र या क्षेपणास्त्र प्रणालीला पूर्वी क्विक रिअ‍ॅक्शन सरफेस-टू-एअर क्षेपणास्त्र (QRSAM) म्हणून ओळखले जायचे, मात्र आता ती अनंत शस्त्र म्हणून ओळखली जात आहे. ही प्रणाली DRDO ने विकसित केली आहे. भारतीय लष्कर या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच ते सहा रेजिमेंट खरेदी करणार आहे.

अनंत शस्त्र प्रणाली का महत्त्वाची आहे?

अनंत शस्त्र प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण (AAD) ला आणखी बळकटी देणार आहे. ही प्रणाली गतिमान आणि चपळ आहे. हा प्रणाली हवेत लक्ष्य शोधू शकते आणि ट्रॅक करू शकते. तसेच ही प्रणाली शत्रूवर हल्लाही करु शकते. या डिफेन्स सिस्टीमची रेंज 30 किलोमीटर आहे.

ऑपरेशन सिंदूरपासून मिळाली प्रेरणा

ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारतीय लष्कराने शेकडो पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेता संरक्षण अधिग्रहण परिषदेने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. भारत पाकिस्तान संघर्षाच्या काळात भारतीय लष्कराच्या एल-70 आणि झू-23 तोफांनी पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. आगामी काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आता अनंत शस्त्रही अशी भूमिका बजावणार आहे.

भविष्यासाठी तयारी

भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेला आता नवीन रडार, कमी पल्ल्याची संरक्षण प्रणाली, जॅमर आणि लेसर शस्त्रे मिळणार आहेत. पाकिस्तानी लष्कराने वापरलेल्या तुर्की आणि चिनी ड्रोनचा सामना करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे स्वदेशी शस्त्रांवर भर देताना दिसत आहेत. भविष्यात लष्कराला झोरावर हलके रणगाडे आणि इतर नवीन हवाई संरक्षण यंत्रणा देखील मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात भारताची ताकद आणखी वाढणार आहे.