अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…

आंध्र प्रदेशातील काही गावांमध्ये अमानवीय प्रथेमुळे महिलांना आजही मासिक पाळी व प्रसूती काळात गावाबाहेर असुरक्षित झोपड्यांमध्ये राहण्यास भाग पाडले जाते. अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेच्या भीतीमुळे मूलभूत सुविधांविना त्यांना जीवन धोक्यात घालावे लागतं.

अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात... असं काय घडतं ? अजब प्रथेने...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Sep 12, 2026 | 4:58 PM

Andhra Pradesh News : एकीकडे संपूर्ण देश डिजीटल क्रांती आणि आधुनिक युगाच्या दिशेने पुढे पावलं टाकतोय, तिथे दुसरीकडे याच देशात मात्र परंपरा आणि अंधविश्वासाच्या नावाखाली महिलांचे शोष करण्याचा भयाक प्रकार समोर येतोय. आंध्र प्रदेशच्या श्री सत्य साई जिल्ह्यात हे घडतंय. तेथील मदाकासिरा क्षेत्रातील रोल्ला मंडळच्या गोल्लाहट्टी (गोल्ला/यादव समुदाय) गावांमध्ये गेल्या अनेक शतकांपासून एक विचित्र आणि अमानवीय प्रथा सुरू असून आजही ती अलात आणली जाते. हे अतिशय भयानक आहे. येथील काही गावांमधील महिलांना आजही मासिक पाळी आणि प्रसूतीच्या काळात गावाबाहेर पाठवलं जातं. त्या गावाच्या हद्दीबाहेर , सुविधांचा अभाव असलेल्या झोपड्यांमध्ये राहण्याची सक्ती महिलांना केली जाते. स्थानिक भाषेत या झोपड्यांना ‘मैला गुडिसेलु’ किंवा ‘माइल हट’ असं म्हटलं जातं. या प्रथेनुसार, एखाद्या मुलीची किंवा महिलेची मासिक पाळी सुरू झाली की तिला तात्काळ घरापासून आणि गावापासून दूर असलेल्या या झोपडीत पाठवलं जातं.

मासिक पाळीच्या काळात महिलांना साधारणपणे तीन ते पाच दिवस कुटुंबापासून पूर्णपणे दूर राहावं लागतं. मासिक पाळी संपल्यानंतर, स्नान केल्यावरच त्यांना पुन्हा घरात प्रवेश दिला जातो. प्रसूतीनंतरची परिस्थिती त आणखी गंभीर आहे. नवजात बाळासह आईला तब्बल 21 दिवसांपासून महिनाभरापर्यंत गावाबाहेर अशाच प्रकारे वेगळे ठेवलं जातं.

अस्पृश्यतेची वागणूक आणि देवाच्या कोपाची भीती

या काळात या महिलांना गावातील इतर व्यक्तींना स्पर्श करण्यास, विहीर किंवा हँडपंप वापरण्यास तसेच मंदिरात जाण्यास मनाई असते. त्यांच्यासाठी स्वतंत्र भांडी आणि कपडे ठेवले जातात. कुटुंबातील सदस्य त्यांच्यासाठी अन्न तयार करून ते दूर ठेवतात आणि तेथून निघून जातात.ग्रामदेवता आणि कुलदेवता नाराज होतील, अशी खोलवर रुजलेली श्रद्धा या प्रथेमागे आहे. मासिक पाळी किंवा प्रसूतीच्या काळात महिला गावात राहिल्यास गावातील दुभती जनावरं आजारी पडतील, पिकांचं नुकसान होई शकतं किंवा आणि गावावर संकट ओढवेल, असा अनेकांचा समज आहे. जर एखाद्या महिलेने किंवा तिच्या कुटुंबियांनी या प्रथेला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला तर गावातील ज्येष्ठ मंडळी त्याना दंड ठोठावतात किंवा समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली जाते.

ना वीज ना शौचालय, जीवातालाही धोका

गावाबाहेर असलेल्या या कच्च्या झोपड्यांमध्ये महिलांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसतात. वीज, शौचालय, स्वच्छ पाणी किंवा सुरक्षित निवाऱ्याची देखील काहीही व्यवस्था नसते. कडाक्याच्या थंडीपासून मुसळधार पावसापर्यंत विविध हवामानाचा, प्रतिकूल परिस्थितीचा सामाना या महिलांना असुरक्षित झोपड्यांमध्ये करावा लागतो. एवढंच नव्हे तर या झोपड्यांच्या आसपास झुडपं आणि जंगल असल्याने साप, विंचू आणि इतर विषारी जीवांचा धोका कायम असतो. रात्रीच्या वेळी तर हा धोका आणखीनच वाढतो. तसेच शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना दर महिन्याला शिक्षणापासून काही दिवस दूर रहावं लागंत, त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होतो.

जनजागृतीची गरज

दरम्यान, महिलांना या जीवघेण्या कुप्रथेतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी टीडीपी सरकारच्या कार्यकाळात गावांमध्ये पाणी, वीज आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांनी सुसज्ज अशी पक्की ‘महिला सामुदायिक केंद्रे’ उभारण्यात आली होती.

तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) वेळोवेळी मोहिमा राबवून अंधश्रद्धा दूर करण्याचा तसेच मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अगदी थोडा का होईना बदल तर झाला पण बहुतांश गोलाहच्ची गावांत आजही परंपरेच्या नावाखाली महिलांचं आरोग्य धोक्यात घातलं जातंय .

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us