AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम

पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम

| Updated on: Sep 12, 2026 | 3:18 PM
Share

पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाविरोधात विद्यानंद बापट यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे. कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या मदतीने महाराष्ट्र पोलीस महासंचालक, पुणे पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली असून, बापट यांच्या मोहिमेला व्यापक पाठिंबा मिळत आहे.

पुण्यातील गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावर आता कायदेशीर लढा सुरू झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला असून, कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्या मदतीने प्रशासकीय यंत्रणांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक, पुण्याचे पोलीस आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीबाबत दिलेले निर्देश संबंधित यंत्रणांकडून पाळले जात नसल्याचे या नोटिसांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

केवळ गणेश मंडळांना दोष न देता, कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे, असे वकील असीम सरोदे यांनी सांगितले. विद्यानंद बापट यांची ही मोहीम केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून, ईद, रमजान, नवीन वर्ष यांसारख्या सर्वच उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात आहे. उत्सवांना विरोध नाही, पण ते इतरांना त्रास न होता, शांततेत साजरे व्हावेत, अशी त्यांची मागणी आहे. या मोहिमेला अनेक नागरी संघटनांसह वकिलांच्या टीमचाही भक्कम पाठिंबा मिळाला आहे.

Published on: Sep 12, 2026 03:18 PM

Follow Us