राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न करणारा अब्दुल कोण आहे? बॅगेत सापडल्या या वस्तू

Ram Mandir : आज एका व्यक्तीने राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखले. चौकशीत या व्यक्तीचे नाव अब्दुल असल्याचे समोर आले आहे. त्याच्या विषयीची माहिती जाणून घेऊयात.

राम मंदिर परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न करणारा अब्दुल कोण आहे? बॅगेत सापडल्या या वस्तू
Abdul Ram mandir News
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 9:13 PM

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिरात भक्तांची नेहमी वर्दळ पहायला मिळते. अशातच आज राम मंदिर परिसरात मोठा गोंधळ पहायला मिळाला. आज एका व्यक्तीने राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखले. यानंतर त्या व्यक्तीने एका विशिष्ट समुदायाविरुद्ध घोषणाबाजीही केली. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. ही घटना मंदिराच्या दक्षिणेकडील तटबंदीच्या परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर संस्था, पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्या तरुणाची चौकशी सुरू केली. या चौकशीत या व्यक्तीचे नाव अब्दुल असल्याचे समोर आले आहे. तो कोण आहे ते जाणून घेऊयात.

अब्दुल कोण आहे?

समोर आलेल्या माहितीनुसार, राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव अब्दुल अहद शेख असे आहे. अब्दुल जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वय 55 वर्षांच्या आसपास आहे. त्याचीचौकशी केली असता असे आढळून आले की, त्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सीता रसोईजवळ नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला त्यापासून रोखण्यात आले.

बॅगेत सापडलेले काजू आणि मनुके

सुरक्षा रक्षकांनी त्याच्यासोबत असलेल्या बॅगेचीही तपासणी केली. या तपासणी दरम्यान सुरक्षा यंत्रणांना बॅगेत काजू आणि मनुके सापडले. चौकशी दरम्यान या व्यक्तीने अजमेरला जात होत अशी माहिती दिली आहे. मात्र तो अयोध्येत का आला, त्याला कोणी सांगितले? तो मंदिर परिसरात का गेला आणि नमाज पठण करण्यामागे त्याचे हेतू काय होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहे.

सुरक्षा कर्मचारांची शोपियान येथील घरी चौकशी

अयोध्येतील या घटनेनंतर अयोध्या पोलिस आणि गुप्तचर संस्थांनी काश्मीरमध्येही तपास सुरू केला आहे. चौकशीसाठी सुरक्षा कर्मचारी या व्यक्तीच्या शोपियान येथील घरी पोहोचले आणि चौकशी केली. यावेळी त्याचा मुलगा इम्रान शेखने सांगितले की त्याचे वडील सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घर सोडून गेले होते. मात्र ते अयोध्येत का गेले किंवा तिथे काय घडले याबद्दल कुटुंबाला माहिती नाही. तसेच कुटुंबाने असे म्हटले आहे की अब्दुल अहद शेख मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. दरम्यान, आता या घटनेनंतर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.