
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठा दावा केला आहे. ब्रिटिश इतिहासकारांच्या चुकीच्या इतिहासामुळे, भारतातील इतिहासात अनेक घोडचुका झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात जोधाबाई आणि मुघल बादशाह अकबर यांच्या लग्नाची कथा पण अशीच सहभागी केल्याचे ते म्हणाले. बुधवारी संध्याकाळी उदयपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. अकबरनामामध्ये जोधा आणि अकबर यांच्या लग्नाचा कोणताही उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला.
नानांचा दावा तरी काय?
हरिभाऊ बागडे यांनी मोठा दावा केला आहे. असे सांगतात की, जोधा आणि अकबर यांचे लग्न झाले होते. त्यावर जोधा-अकबर या चित्रपटाचे नाव न घेता एक सिनेमा पण तयार झाला. इतिहासाची पुस्तकं पण असंच म्हणतात. पण हे सर्व झूठ, खोटं आहे. भारमल एक राजा होता आणि त्याच्या दासीच्या मुलीशी अकबराचे लग्न लावण्यात आले होते, असे नाना म्हणाले.
वादाला बसली फोडणी
1569 मध्ये आमेर येथील राजा भारमल याची मुलगी आणि अकबर यांच्यात शाही विवाह झाल्याच्या त्या ऐतिहासिक माहितीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. राज्यपालांच्या ताज्या वक्तव्यामुळे वादाची फोडणी बसली. आमेर वा अंबर हे जयपूर जवळील एक राजपूत राज्य होते. सवाई जय सिंह द्वितीय यांनी 1727 मध्ये राजधानी जयपूर येथून हलवण्यापूर्वी कछवाहा रजपूतांचे येथे शासन होते.
इंग्रजांनी आपल्या नायकांचा इतिहास बदलला आहे. त्यांनी इतिहास चुकीच्या पद्धतीने लिहिला. त्यांचा हा इतिहासच मान्य करण्यात आला. नंतर काही भारतीयांनी इतिहास लिहिला, तो पण इंग्रज इतिहासकारांच्या लेखनीने प्रभावित होता, असा आरोप हरिभाऊ बागडे यांनी केला.
महाराणा प्रताप यांच्याविषयी कमी माहिती
महाराणा प्रताप यांनी अकबराला युद्धबंदीसाठी पत्र लिहिल्याचा इतिहासातील दावा खोटा असल्याचे बागडे म्हणाले. ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे ते म्हणाले. महाराणा प्रताप यांनी स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही. इतिहासात अकबराविषयी अधिक माहिती दिली जाते पण महाराणा प्रताप यांच्याविषयी कमी शिकवण्यात येत असे बागडे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे देशभक्तीचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. या दोघांमध्ये 90 वर्षांचे अंतर होते. ते जर समकालीन असते तर देशाचा इतिहास काही वेगळाच असता, असा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला.