
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे, अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानसोबतची सर्व प्रकारची आयात-निर्यात देखील बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. पाकिस्तानी नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या देणं सुरूच आहे.
दुसरीकडे भारतासोबत युद्धाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानमध्ये घडामोडींना वेग आला आहे. असा दावा करण्यात येत आहे की, पाकिस्तानच्या कलात जिल्ह्यातल्या मंगोचर शहरातील अनेक इमारतींवर बलूच बंडखोरांनी कब्जा केला आहे. या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रिपोर्टनुसार मंगोचर शहरातील अनेक सरकारी इमारतींवर बलूच बंडखोरांनी कब्जा केला आहे. त्यांनी या शहरांवर आणलं नियंत्रण प्रस्तापीत केलं आहे.
या रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, यादरम्यान पाकिस्तानी सैन्य आणि बलूच बंडखोरांमध्ये जोरदार चकमक झाली. ज्यामध्ये बलूच बंडखोरांकडून सैनिकांच्या एका कॅम्पवर हल्ला करण्यात आला, तेथील शस्त्र-आस्त्र देखील त्यांनी ताब्यात घेतली आहेत.
पाकिस्तानवर दबाव वाढला
पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे. भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत, त्यातच आता बलूच बंडखोरांनी देखील पाकिस्ताविरोधात बंड केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या संकटात आता आणखी भर पडली आहे.
दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानी नेत्यांकडून सातत्यानं विखारी भाषा वापरली जात आहे, युद्धाच्या पोकळ धमक्या देखील दिल्या जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार भारतानं टाकलेला दबाव कमी करण्यासाठी आता पाकिस्तानने त्यांच्या मित्र राष्ट्रांकडे मदत देखील मागितल्याचं समोर आलं आहे.