
बांग्लादेशातल्या परिस्थितीवर भारताची बारीक नजर आहे. बांग्लादेशात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तरं दिली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बांग्लादेशातील हिंसाचारामागे परकीय शक्ती आहेत का? असा प्रश्न केला. त्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “परकीय शक्ती यामागे आहेत का? यावर आताच बोलणं घाईच ठरेल. एका पाकिस्तानी डिप्लोमॅटने आपला प्रोफाईल पिक्चर चेंज केला आहे. त्याने हिंसेच समर्थन केलय. तो अधिकारी ढाक्यामध्येच होता. पण आताच काही बोलणं घाईच ठरेल”
आम्ही बांग्लादेश लष्कराच्या संपर्कात आहोत असं जयशंकर यांनी बैठकीत सांगितलं. तिथे 20 हजार भारतीय होते. बहुतांश विद्यार्थी होते. एडवायजरी नंतर 8 हजार भारतीय मायदेशी परतले. आम्ही सरकारसोबत आहोत, असं विरोधी पक्षाने यावेळी सांगितलं. तृणमुल काँग्रेसने सरकारला बॉर्डरबद्दल विचारलं, त्यावर सरकारने सांगितलं की, ‘अजून सीमेवर चिंताजनक स्थिती नाहीय. आमचं बारीक लक्ष आहे’
Briefed an All-Party meeting in Parliament today about the ongoing developments in Bangladesh.
Appreciate the unanimous support and understanding that was extended. pic.twitter.com/tiitk5M5zn
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 6, 2024
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काय म्हटलं?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जयशंकर यांनी संसद भवनातील बैठकीचे फोटो शेयर केले. “आज संसदेत त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत बांग्लादेश घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. यावेळी सर्वपक्षीय समर्थन आणि जो समन्वय दाखवला, त्या बद्दल सर्व पक्षांच कौतुक करतो” असं परराष्ट्र मंत्र्यांनी लिहिलय. शेख हसीना यांनी काल बांग्लादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व त्या तातडीने भारतात निघून आल्या. बांग्लादेशात सध्या अराजकाची स्थिती निर्माण झालीय. शेख हसीना अमेरिकन बनावटीच्या सी-130 जे सैन्य विमानाने भारतात आल्या. त्यांची लंडनला जाण्याची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत या मुद्यावर माहिती घेतली.