Bengaluru Stampede : बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाईचा चाबूक, राज्य सरकारकडून पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन

बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आरसीबीच्या आनंदाला गाळबोट लागलं. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृ्त्यू झाला. या प्रकरणात राज्य सरकारने कारवाईचा चाबूक फिरवला आहे. राज्य सरकारने पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे.

Bengaluru Stampede : बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाईचा चाबूक, राज्य सरकारकडून पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन
Bengaluru Stampede
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 05, 2025 | 11:06 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर 4 जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे  सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात आलं. तसेच यावरुन राजकारणही रंगलं. बंगळुरुतील या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात पाहायला मिळतेय. या सर्व दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. कर्नाटक सरकारने मोठी कारवाई केली आहे. राज्य सरकारने दुर्घटनेनंतर पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. राज्य सरकारने पोलीस आयुक्तांव्यतिरिक्त,अतिरिक्त पोलिस आयुक्त, मध्य विभागाचे डीसीपी, एसीपी, क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे निरीक्षक, स्टेशन हाऊस ऑफिसर आणि क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केलंय.

11 जणांचा मृत्यू, जखमींचा आकडा 50 पार

एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर जखमींचा आकडा हा 50 पार पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 56 जण जखमी आहेत. राज्य सरकारच्या या कारवाईआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बंगळुरूतील क्यूबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.आरसीबीच्या विजयी जल्लोषाच्या नियोजनात बेजबाबदारपणा बाळगल्याचा उल्लेख या एफआयआरमध्ये केला आहे.

निलंबित अधिकाऱ्यांचे नाव आणि पद

  • बी. दयानंद, पोलीस आयुक्त, बंगळुरू शहर.
  • विकास कुमार – अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग.
  • शेखर – पोलीस उपायुक्त (मध्य विभाग)
  • बाळकृष्ण – एसीपी, क्यूबन पार्क विभाग.
  • गिरीश – पोलीस निरीक्षक, क्यूबन पार्क पोलिस स्टेशन.

चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी

कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणात दखल घेतली आणि राज्य सरकारकडून अहवाल मागितला. न्यायालयात या प्रकरणी आज 5 जून रोजी सुनावणी झाली. चूक कुठे झाली याचा तपास सुरू आहे. अचानक अडीच लाख चाहते स्टेडियमच्या बाहेर कसे पोहोचले? याची चौकशी केली जात आहे, असं सरकारने न्यायालयात सांगितलं.

राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा

मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

दरम्यान या दुर्घटनेनंतर काही तासांनी कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर त्यानंतर आज 5 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अधिकृत निवदेन जारी करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं. तसेच चाहत्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी यासाठी आरसीबीकडून ‘आरसीबी केअर्स’ फंड तयार करण्यात येत असल्याची माहिती फ्रँचायजीकडून देण्यात आली.