ओला-उबरला झटका, मोदी सरकारकडून भारत टॅक्सी योजना सुरु, चालकांसह प्रवाशांना काय फायदा?

अमित शहा यांनी देशातील पहिल्या सहकारी-आधारित 'भारत टॅक्सी' सेवेचे उद्घाटन केले असून, ही सेवा ओला आणि उबरच्या मक्तेदारीला आव्हान देणार आहे. झिरो कमिशन मॉडेल, स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सना विमा संरक्षण देणाऱ्या या क्रांतिकारी उपक्रमाबद्दल सविस्तर जाणून घ्या.

ओला-उबरला झटका, मोदी सरकारकडून भारत टॅक्सी योजना सुरु, चालकांसह प्रवाशांना काय फायदा?
bharat taxi
| Updated on: Feb 05, 2026 | 1:13 PM

गेल्या काही काळापासून ओला आणि उबरसारख्या खाजगी कॅब कंपन्यांकडून आकारले जाणारे अवाढव्य चार्जेस, ऐनवेळी ड्रायव्हरकडून होणारे राईड कॅन्सलेशन आणि प्रवाशांची होणारी लूट या त्रासातून आता सामान्य जनतेची मुक्तता होणार आहे. भारतातील वाहतूक क्षेत्रात आज एक क्रांतिकारी बदल घडणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारतातील पहिल्या सहकारी-आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म भारत टॅक्सी सुरु करण्यात आली आहे. नुकतंच याचे अधिकृत उद्घाटन पार पडले. सहकार से समृद्धी या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम ओला आणि उबरसारख्या जागतिक कंपन्यांच्या मक्तेदारीला थेट आव्हान देणार आहे.

भारत टॅक्सी नक्की काय?

ज्याप्रमाणे अमूलमध्ये दूध उत्पादक शेतकरीच मालक असतात. तसेच भारत टॅक्सीमध्ये टॅक्सी चालक ड्रायव्हर्स हेच मालक आहेत. ही एक सहकारी (Cooperative) संस्था आहे. ती चालकांनी चालकांसाठी सुरू केली आहे. ओला-उबर सारख्या कंपन्यांमध्ये ड्रायव्हरला प्रत्येक कमाईवर २० ते ३० टक्के कमिशन कंपनीला द्यावे लागते. भारत टॅक्सीमध्ये झिरो कमिशन आहे. त्यामुळे प्रवाशाने दिलेले पूर्ण पैसे ड्रायव्हरच्या खिशात जातात.

प्रवाशांना फायदा काय?

कंपनीला कमिशन द्यावे लागत नसल्यामुळे प्रवाशांना ही टॅक्सी इतर ॲप्सपेक्षा २०-३० टक्के स्वस्त पडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाऊस किंवा गर्दीच्या वेळी यात वाढीव दर नसतात. यात काम करणाऱ्या ड्रायव्हर्सना संस्थेचे शेअर्स मिळतात. त्यामुळे ते केवळ ड्रायव्हर न राहता व्यवसायाचे भागीदार बनतात.

स्वस्त असूनही यात महिलांसाठी पॅनिक बटन, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि विमा संरक्षण यांसारख्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. यामुळे ही प्रवाशांचे पैसे वाचवणारी भारतीयांची स्वतःची टॅक्सी सेवा असणार आहे.

ड्रायव्हरचा फायदा काय?

या प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे ‘झिरो कमिशन’ मॉडेल. खाजगी कंपन्या ड्रायव्हर्सकडून २०-३० टक्के कमिशन घेतात, मात्र भारत टॅक्सीमध्ये कमिशन नसेल, ज्यामुळे प्रवाशाने दिलेले पूर्ण पैसे ड्रायव्हरला मिळतील. या ठिकाणी ड्रायव्हर केवळ कामगार नसून त्याला कंपनीचे शेअर्स (भागधारक) दिले जातात. तसेच प्रत्येक ड्रायव्हरला ५ लाखांचा अपघात विमा आणि ५ लाखांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे.

२०२९ पर्यंत देशातील सर्वात मोठी टॅक्सी सेवा बनणार

डिसेंबर २०२५ मध्ये दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये या सेवेचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. सध्या या प्लॅटफॉर्मशी ४ लाख ड्रायव्हर्स आणि १० लाखांहून अधिक ग्राहक जोडले गेले आहेत. सुरुवातीला दिल्लीतून सुरू झालेली ही सेवा लवकरच देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सुरु केली जाणार आहे. २०२९ पर्यंत ही देशातील सर्वात मोठी टॅक्सी सेवा बनवण्याचे सरकारचे नियोजन आहे. यामुळे ओला उबर चालकांना मोठा फटका बसणार आहे.