
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेत आसाममधील एक कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या देबाशीष भट्टाचार्य यांनी आपला भयावह अनुभव सांगितला आहे.
या हल्ल्याबाबत बोलताना देबाशीष भट्टाचार्य यांनी सांगिलं की, ते आणि त्यांची पत्नी आसाम विश्वविदालयाच्या बंगाली भाषेच्या विभागात कार्यरत आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेले होते, त्याचवेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही देखील तिथेच होतो. हा हल्ला झाला तेव्हा आम्ही एका झाडाच्या अडोशाला लपलो होते. तेव्हा मला तिकडे दिसलं की काही लोक कलमाचं पठण करत आहेत, तेव्हा मी देखील त्या लोकांमध्ये सहभागी झालो.
त्यावेळी एक दहशतवादी माझ्यासमोर आला आणि त्याने मला विचारलं इथे तू काय करतोय, तू काय म्हणत आहेस? रामाचं नाव घेत आहेस का? त्यावेळी मी जोर जोराने कलमा म्हणून लागलो. खरं पाहाता मला पूर्ण कलमा येत नव्हता. मात्र त्या दहशतवाद्याने माझ्याकडे फार काही लक्ष दिलं नाही आणि माझा जीव वाचला. मी दाढी देखील वाढवली होती, आणि कलमाचे देखील पठण केले त्यामुळे माझा जीव वाचला, तो दहशतवादी माझ्यापासून दूर चालला गेला असं देबाशीष यांनी म्हटलं आहे.
देबाशीष यांच्या पत्नी मधुमिता दास यांचे बंधू नबेंदू दास यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं की, सुदैवानं दाढी असल्यामुळे दहशतवादी त्यांना ओळखू शकले नाही, त्यामुळे देबाशीष यांचा जीव वाचला. देबाशीष भट्टाचार्य, त्यांची पत्नी मधुमिता दास भट्टाचार्य आणि त्यांचा मुलगा द्रौदीप भट्टाचार्य हे सर्व सुरक्षीत असून, ते श्रीनगरमध्ये आहेत, अशी माहिती नबेंदू दास दिली आहे. या हल्ल्यानंतर आता जम्मू -काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.