काँग्रसला मोठा झटका, बॉक्सर विजेंद्र सिंग याचा भाजपमध्ये प्रवेश

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्यासोबत दिसणारा बॉक्सर विजेंद्र सिंग याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसकडून २०२९ मध्ये विजेंद्र सिंगने निवडणूक लढवली होती. पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

काँग्रसला मोठा झटका, बॉक्सर विजेंद्र सिंग याचा भाजपमध्ये प्रवेश
| Updated on: Apr 03, 2024 | 3:38 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची उत्सुकता वाढत चालली आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसला सतत धक्के बसत आहेत. भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिला आहे. बॉक्सर विजेंद्र सिंग याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात त्यांना भाजपचे सदस्य केले.

बॉक्सर विजेंद्र सिंगने ट्विटरवर एक पोस्ट केली होती. ज्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. त्याने लिहिले की, ‘जेथे जनतेची इच्छा असेल, मी तयार आहे.’ 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या विजेंद्र याला पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र डिसेंबर २०२३ मध्ये त्यांनी सोशल मीडियावर राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, तो पुन्हा राजकारणात आला आहे.

विजेंद्र याची राजकीय कारकीर्द फारच लहान राहिली आहे. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून, त्याने दक्षिण दिल्लीच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. परंतु रमेश विधुरी यांच्या विरोधात त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर राजकारणातील सक्रियता कमी झाली आणि डिसेंबर २०२३ मध्ये त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राजकारणाला राम-राम केला होता. पण आता विजेंद्र सिंगने राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

विजेंद्र सिंग बेनिवाल हा हरियाणा येथील जाट समाजातून येतो. त्याचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील कालुवास नावाच्या गावात झाला होता. त्याचे वडील महिपाल सिंग बेनिवाल हे हरियाणा रोडवेजमध्ये बस ड्रायव्हर आहेत आणि आई कृष्णा देवी या गृहिणी आहेत. विजेंद्रचा मोठा भाऊ मनोज हा देखील बॉक्सर आहे. विजेंद्रने आपले प्राथमिक शिक्षण कालुवास येथील शाळेतून पूर्ण केले आहे.