
संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. आता राज्यात कुणाची सत्ता येणार याबाबत एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच टीव्ही चॅनेल आणि एजन्सींनी बिहारमध्ये एनडीएचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फलोदी सट्टा बाजारात एनडीएला 130 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला 95 च्या आसपास जागा मिळू शकतात. मात्र फलोदी सट्टा बाजारात कोणत्या पक्षाचा रेट किती आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
फलोदी सट्टेबाजारात एनडीएचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपला 68 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाला 58 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीला 89 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीला 68 ते 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाआघाडीतील दुसरा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसला 13 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे.
फलोदी सट्टाबाजारात पक्षांच्या विजयाच्या शक्यतांवर भाव ठरला जातो. भाजपच्या 60 जागांसाठी 30/40 रेट आहे. भाजपला 65 जागा जिंकण्याच्या अंदाजासाठी 60/70 रेट आहे. एनडीए 125 जागा जिंकण्याच्या अंदाजाचा रेट 24/33 आहे. एनडीएच्या 130 जागांसाठी 33/43 रेट आहे. तर एनडीएच्या 135 जागांसाठी 45/55 रेट आहे. तर एनडीए आघाडीच्या 140 जागांसाठी 65/80 रेट आहे. तर काँग्रेससाठी 85/100 चा भाव सुरु आहे.
इतर काही संस्थांच्या अंदाजानुसार, बिहारचे विद्यामान मुख्यमंत्री नितीश कुमार याचा जेडीयू हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. एनडीएला बहुमत मिळाल्यास जेडीयू आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच पहायला मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही भाजपला मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी आहे, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र नितीश कुमार यांच्या पक्षाला जास्त जागा मिळण्याचा अंदाज असल्याने ते मुख्यमंत्री पदावर दावा करण्याची शक्यता आहे.