मोठी बातमी ! मासे खाऊ नका… नेपाळमधील जलप्रलयानंतर मोठं आवाहन; या सरकारकडून अॅडव्हायजरी जारी
नेपाळमधील जलप्रलयामुळे बिहारमधील नद्यांमध्ये अज्ञात मासे आले आहेत, ज्यामुळे अनेकजण आजारी पडले. बिहार सरकारने नागरिकांना दूषित मासे खाऊ नयेत असे आवाहन केले आहे. पूर आलेल्या पाण्यात पकडलेले मासे जीवाणू, विषाणूंनी दूषित असू शकतात, ज्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आरोग्य स्थिर होईपर्यंत मासे टाळण्याचे आवाहन आहे.

बिहारमध्येही पुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बिहार सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. सरकारने थेट राज्यातील जनतेला मासे न खाण्याचं आवाहन केलं आहे. बिहार सरकारच्या डेअरी, मत्स्य आणि पशू संसाधन विभागाने ही सूचना जारी केली आहे. बिहारमध्ये पुराची स्थिती निर्माण झाल्याने हे आवाहन करण्यात आलं आहे. सरकारच्या सूचनेचं थेट नेपाळच्या जलप्रलयाशी संबंध आहे. त्यामुळेच सरकारने हे आवाहन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नेपाळमध्ये जलप्रलय आल्याने या पुराच्या पाण्याबरोबर काही मासे बिहारच्या नद्यांमध्ये दाखल झाले आहेत. हे अज्ञात आणि असामान्य प्रकारचे मासे आहेत. हे मासे खाल्ल्यानंतर काही लोक आजारी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बिहारच्या लोकांनी मासे खाऊ नये, असं मत्स्य विभागाने म्हटलं आहे.
तर प्रकृती बिघडेल
पूर आल्यानंतर तलाव, नद्या, सरोवर आणि जलाशयातून मासे बाहेर पडतात आणि दूर दूर पर्यंत जातात. हे मासे घाणेरडे नाले, मृत जनावरे आणि इतर घाणीच्या सातत्याने संपर्कात असतात. त्यामुळे हे मासे जीवाणू, विषाणू आणि इतर गोष्टींमुळे दूषित होतात. त्यामुळे असे मासे खाल्ल्याने प्रकृती बिघडण्याची शक्यता अधिक असते. हे मासे आरोग्याला हानिकारक असतात, असं मत्स्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
मासे कधी खायचे?
जोपर्यंत वातावरण स्थिर होत नाही आणि नैसर्गिकरित्या घाण आणि आजार फैलावणाऱ्या गोष्टी समाप्त होत नाहीत, तोपर्यंत पुराच्या पाण्यात पकडण्यात आलेले मासे खाऊ नका, असं विभागाने म्हटलं आहे. सामान्य लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच या विभागाने पुराच्या पाण्यात पकडण्यात आलेले मासे बाजारात विकण्यासही मनाई केली आहे. तसेच नागरिकांनी कोणतेही अनोळखी मासे घेऊ नये. त्याचं सेवन करू नये. भलेही ते स्वस्त मिळत असले तरी असे मासे खाऊ नका, असं विभागाने स्पष्ट केलं आहे.
लगेच रुग्णालयात जा
हे मासे चुकून खाल्ले आणि तुम्हाला उलट्या, दस्त, पोटदुखी, चक्कर तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच जवळच्या रुग्णालयात संपर्क साधा, असं आवाहन विभागाने केलं आहे. तसेच असे अनोळखी मासे दिसल्यावर जिल्हा मत्स्य अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाला सूचना द्या. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही मत्स्य विभागाने स्पष्ट केलं आहे.