Video : वारे पठ्ठ्या, चोराच्या भीतीने स्कॉर्पिओ थेट छतावर चढवली; अनोख्या जुगाडची देशात चर्चा !
गोपालगंजमध्ये चोरीच्या भीतीने एका कारमालकाने स्कॉर्पिओ थेट घराच्या छतावर पार्क केली. नव्या कोऱ्या कारच्या संरक्षणासाठी क्रेनच्या मदतीने हा अनोखा 'जुगाड' केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या अजब पार्किंगची सध्या जोरदार चर्चा आहे.

गोपालगंजमध्ये कार चोरीच्या भीतीने एका कारमालकाने असा काही जुगाड केला, की बघणारेही हैराणच झाले. दोन मजली घराच्या गच्चीवर Scorpio ठेवण्यासाठी चक्क क्रेनची मदत घेण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिहारच्या गोपालगंजमधून एक असा अजब प्रकार समोर आलाय, ज्यामुळे केवळ स्थानिक लोकांचच नव्हे तर सोशल मीडिया युजर्सचं लक्षही वेधलं गेलं आहे. तिथे एका घरमालकाने त्याची नवी महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक गाडीचं चोरांपासून रक्षण करण्यासाठी अनोख जुगाड केला. त्याने त्याची नवी कोरी कार थेट घराच्या दुसऱ्या मजल्यावर पार्क केली. आणि त्यासाठी त्याने चक्क एका क्रेनची मदत घेतली.
परदेशात राहतात घरमालक
मिळालेल्या माहितीनुसार, ही अजब गजब घटना गोपालगंजच्या मांझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मीरा टोला गावातील आहे. तेथील रहिवासी असलेले मनोज यादव यांनी नवी स्कॉर्पिओ क्लासिक ही गाडी नुकतीच खरेदी केली. यादव हे पदेशात नोकरी करतात आणि घरी केवळ त्यांची पत्नी असते.
चोरांच्या भीतीने उचललं मोठं पाऊल
मनोज यादव हे परदेशात गेल्यानंतर या गाडीची देखभाल करण्यासाठी आणि ती चालवण्यासाठी एक ड्रायव्हर नेमण्यात आला होता. मात्र, काही काळानंतर त्या ड्रायव्हरलादेखील कामानिमित्त परदेशात जावं लागलं. तो ड्रायव्हर गेल्यानंतर नव्याकोऱ्या कारच्या सुरक्षेचं मोठं आव्हान यादव कुटुंबियांसमोर उभं राहिवलं.
चक्क छतावर ठेवली कार
स्थानिकांच्या सांगण्यानुसार, घरात कोणताही पुरूष नसल्याने ती गाडी चोरीला जाण्याची किंवा तिचं नुकसान होण्याची भीती कुटुंबियांना वाटत होती. दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याने ती नवीकोरी गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी कुटुंबियांनी एक भन्नाट उपाय शोधला. त्यांनी अखेर एक मोठी क्रेन बोलावली. त्यानंतर ही वजनदार स्कॉर्पिओ कार, क्रेनच्या मदतीने हवेत उचलून दोन मजली घराच्या छतावर नेण्यात आली आणि तिथेच पार्क करण्यात आली.
“इ बिहार है बाबू, नहीं समझ पाइएगा क्या चीज़ हैं हम!
✍️
गोपालगंज में घर के मालिक विदेश जा रहे थे, तो उन्हें अपनी स्कॉर्पियो की चोरी होने का डर सताने लगा। चोरों से गाड़ी बचाने के लिए उन्होंने जुगत भिड़ाई और क्रेन बुलवाकर पूरी की पूरी गाड़ी सीधे अपने मकान की छत पर ही पार्क करवा दी!… pic.twitter.com/McTuaKRjZv— Sanjay Kishore (@saintkishore) September 7, 2026
ती कार छतावर चढवतानाचं हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि पाहता पाहता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. तेव्हापासूनच या अनोख्या पार्किंगची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी हा उपाय म्हणजे गाडीच्या सुरक्षेसाठीचा भन्नाट ‘जुगाड’ असं म्हटलं. तर काहींनी त्या घराच्या छताच्या मजबुतीबाबत प्रश्न उपस्थित केलेत. इतक्या वजनदार गाडीचा भार, त्या घराचं छत कितपत सहन करू शकेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी संबंधित कुटुंबाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.