गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत…, हिंसेकडून विकासाकडे…, भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. तीन राज्यांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत..., हिंसेकडून विकासाकडे..., भाजपाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
pm modi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 04, 2026 | 9:06 PM

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. तीन राज्यांमध्ये आसाम, पश्चिम बंगाल आणि पुडूचेरीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. दरम्यान भाजपला मिळालेल्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केलं आहे. त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. नरेद्र मोदी यांनी दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयातून जनतेशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जयच्या घोषणेनी केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की आजचा दिवस हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा आहे. आता विकासाची गंगा गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत वाहील असं मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालच्या विजयावर प्रतिक्रिया देताना आता बदला नाही तर बदल घडले असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राजकीय पक्षांना हिंसामुक्त वातावरणाचं आवाहन देखील केलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी?

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस या देशाची संस्कृती समजूच शकली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की आमच्यासाठी भारत आणि भारतीयता हेच सर्वकाही आहे. भाजप कधीही घराणेशाहीचं राजकारण करत नाही तर तळागाळातील राजकारण करतं, असा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पार्टीवर देखील निशाणा साधला. त्यांनी समाजवादी पार्टीला महिलाविरोधी म्हटलं आहे. तुम्ही काहीही करा तुमचं पाप धुतलं जाणार नाही असंही यावेळी मोदी यांनी समाजवादी पार्टीला म्हटलं.

आज संपूर्ण देशात असं एकही राज्य राहिलं नाही जिथे कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे. हा फक्त राजकीय बदल नाही तर हा विचारांमधील बदल आहे. हा विजय आपल्याला हेच सांगतोय की विकसित भारत कोणत्या दिशेने पुढे जाऊ इच्छित आहे. आज भारताला विकास हवा आहे. भारताला संधी हवी आहे. मात्र दुर्दैवाने काँग्रेस नेमकी याच्या उलट दिशेनं जात आहे. आता विकासाची गंगा गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत वाहत राहील असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us