
गोव्यात सर्रासपणे ड्रग्स विक्री केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. पण सत्ताधारी वारंवार हा आरोप खोडून काढत आहेत. आता मात्र गोव्याच्या कायदा मंत्र्यानेच ही कबुली दिल्याने सरकार चांगलंच पेचात पडलं आहे. गोव्याचे कायदा मंत्री एलेक्सो सिक्वेरा यांनी ही कबुली दिली आहे. राज्यात सर्वत्र ड्रग्स मिळतात. पण कोणतीच कारवाई केली जात नाही, असं एलेक्सो सिक्वेरा म्हणाले. सिक्वेरा यांच्या या विधानाने गोवा सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे.
राज्याच्या कायदा मंत्र्यानेच थेट विधान केल्याने विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपला चांगलंच घेरलं आहे. तर, कायदा मंत्री गोव्याबाबत बोलत नाहीयेत. तर परिस्थिती सांभाळण्याबाबत बोलत आहेत, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एलेक्सो सिक्वेरा यांनी मडगाव येथे ध्वजारोहण केलं. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सनबर्न ईडीएमचं (इलेक्ट्रॉनिक डान्स म्यूजिक) समर्थन केलं. गोव्यात दरवर्षी हा उत्सव केला जातो, असं सांगतानाच ड्रग्सच्या कथित वापरावरही सिक्वेरा यांनी टीका केली. आज मादक पदार्थ प्रत्येक ठिकाणी मिळतात. ते मिळवण्यासाठी सनबर्नची आवश्यकता नाही, असंही ते म्हणाले.
मादक पदार्थ कोणी विकत असेल तर त्याची खबर पोलिसांना देणं हे समाजाचं काम आहे. कोण ड्रग्स विकतंय हे समाजाने पाहिलं पाहिजे. तसेच आपल्या राज्यात मादक पदार्थांची विक्री होणार नाही याची काळजीही समाजाने घेतली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला तुम्हीच सांगा मादक पदार्थ विकले जात नाही का? तुम्ही काय करत आहात? मी काय करत आहे? काहीच नाही. आता तुम्ही आणि मी एकत्र येऊन या संकटाला आक्रमकपणे तोंड देण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, विरोधी पक्षाने सिक्वेरा यांच्या विधानावरून थेट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरच निशाणा साधला आहे. जर राज्यात प्रत्येक ठिकाणी ड्रग्स मिळत असतील तर मग त्यावर नियंत्रण घालण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनाच आता बदलण्याची वेळ आली आहे, असा हल्लाच आम आदमी पार्टीचे आमदार वेन्जी विगास यांनी सांगितलं.
गोव्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी ट्विट केलं आहे. कायदा मंत्री एलेक्स सिक्वेराने कबुली दिली आहे. त्यांनीच आता भाजप सरकारचा पर्दाफाश केला आहे, असं सुनील कवठणकर यांनी म्हटलं आहे. राज्यातील ड्रग्सचे धंदे रोखण्यात सरकारला अपयश आलं आहे, असा हल्लाची सुनील कवठणकर यांनी चढवला आहे.
गोवा फॉरवर्ड पार्टी के महासचिव तथा प्रवक्ता दुर्गादास कामत यांनीही ट्विट करून सरकारवर हल्ला चढवला आहे. संपूर्ण गोव्याला जे माहीत आहे, ते सत्य आता काही मंत्री बोलत आहेत. राज्यातील अंमलीपदार्थाच्या सर्रास विक्रीला आवर घालण्यास नार्कोटिक्स विभाग आणि पोलिसांना अपयश आलं आहे, असं दुर्गादास कामत यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर सारवासारव करताना मंत्र्यांना तसं म्हणायचं नव्हतं. त्यांची जीभ घसरली होती. गोव्यातच नव्हे तर संपूर्ण जगात मादक पदार्थ आहेत, असं त्यांना म्हणायचं होतं, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.