ब्रिक्स शिखर परिषदेतील गुच्छी मशरूमची चर्चा, किंमत तब्बल 40 हजार रुपये किलो, विशेषता काय?
गुच्छी मशरूमची सर्वात खास बाब म्हणजे तिची व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लागवड करणे अत्यंत कठीण आहे. ही मशरूम जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील उंच पर्वतीय भागात नैसर्गिकरीत्या आढळते.

BRICS Summits : भारताने ब्रिक्स शिखर परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही 18 वी ब्रिक्स शिखर परिषद झाली. या परिषदेसाठी विविध देशांचे नेते आणि परदेशी पाहुणे भारतात आले होते. या पाहुण्यांसाठी शनिवारी खास गाला डिनरचे आयोजन करण्यात आले. या मेजवानीत भारतीय खाद्यसंस्कृतीची झलक पाहायला मिळाली. त्यामध्ये गुच्छी मशरूम या दुर्मिळ आणि महागड्या मशरूमचा समावेश होता. ही मशरुम जगभरात चांगलीच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे एक किलो गुच्छी मशरुम खरेदी करायची असेल तर तब्बल 40 हजार रुपये मोजावे लागतात. म्हणूनच या मशरुममध्ये नेमकं काय आहे? असं विचारलं जातंय.
मशरुमची किंमत तब्बल 40 हजार रुपये?
ब्रिक्स डिनरमध्ये गुच्छी मशरूमपासून खास डिश तयार करण्यात आली होती. केशर, मनुका आणि मामरा बदाम यांच्या मदतीने या मशरूमची डिश पाहुण्यांना खायला देण्यात आली. गुच्छीची चांगल्या प्रतीची वाळवलेली मशरूम बाजारात तब्बल 15 हजार ते 40 हजार रुपये किलो दराने विकली जाते.
गुच्छी मशरुम एवढे महाग का?
गुच्छी मशरूमची सर्वात खास बाब म्हणजे तिची व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लागवड करणे अत्यंत कठीण आहे. ही मशरूम जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील उंच पर्वतीय भागात नैसर्गिकरीत्या आढळते. बर्फ वितळल्यानंतर निर्माण होणारी आर्द्रता, तापमानातील बदल आणि विशिष्ट माती असेल तरच या मशरूमची वाढ होते. हे मशरूम दुर्गम जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागात शोधून गोळा करावे लागते. त्यातही हंगाम कमी कालावधीचा असल्याने उपलब्धता मर्यादित असते. त्यामुळे बाजारात या मशरुमची किंमत मोठ्या प्रमाणात वाढते.
गुच्छी मशरूमचे आरोग्यदायी फायदे
गुच्छीमध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. काही अहवालांमध्ये त्यात व्हिटॅमिन D असल्याचाही उल्लेख केला जातो. मात्र पोषक घटकांचे प्रमाण मशरूमची प्रजाती, वाढीचे वातावरण आणि ते ताजे किंवा वाळवलेले आहे यावर अवलंबून असते. त्यामुळे गुच्छी मशरूम केवळ महागडेच नाही, तर पोषणमूल्याच्या दृष्टीनेही विशेष मानले जाते.