
भारतात लग्न म्हणजे एक भावनिक, पारंपरिक आणि सामाजिक सोहळा. सामान्यतः नवरी वडिलांच्या घरातून वऱ्हाडासोबत वराच्या घरी जाते आणि तिची सासरी पाठवणी होते. पण भारतातच एक असं ठिकाण आहे जिथे हा सगळा रिवाज उलटा आहे! इथे नवरी आपल्या घरी वरात घेऊन येते आणि नवर्याची पाठवणी होते. ही रीत सामाजिक समानतेचं प्रतिक मानली जाते आणि काही समाजांमध्ये आजही तो आवर्जून पाळली जाते. चला तर मग, जाणून घेऊया या अनोख्या परंपरेची कहाणी
ईशान्य भारतातील सुंदर राज्य मेघालयमध्ये ‘खासी’ नावाचा एक प्रमुख आदिवासी समुदाय राहतो. खासी जमात ही भारतातील सर्वात मोठ्या मातृसत्ताक समाजांपैकी एक आहे. या समाजाची खासियत म्हणजे इथे मातृसत्ताक पद्धतीचे पालन केले जाते. म्हणजेच, महिलांना कुटुंबात आणि समाजात खूप महत्त्वाचे स्थान आणि अधिकार दिले जातात. या समाजात महिलांना केवळ कुटुंबाच्याच नाही, तर समाजाच्या आणि आर्थिक निर्णय प्रक्रियेतही अग्रस्थानी ठेवले जाते.
लग्नाची अनोखी परंपरा
खासी समाजाचा विवाह सोहळा आपल्या पारंपरिक लग्नापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. इथे नवरदेव वरात घेऊन येत नाही, तर नवरी मुलगीच मोठ्या थाटामाटात वरात घेऊन नवरदेवाच्या घरी जाते. हा एक प्रकारचा ‘उलटा’ रिवाज आहे, जिथे पारंपरिक भूमिका बदलतात. लग्नानंतर नवरदेवाची पाठवणी केली जाते, जिथे तो तिच्या आई-वडिलांसोबत तिच्याच घरी राहायला जातो. विशेष म्हणजे, सर्वात धाकट्या मुलीचा नवरा तिच्याच घरी राहण्याची पद्धत आहे. खासी समाजात मुलींना आपला जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर कोणताही दबाव नसतो. तसेच, कुटुंबाच्या संपत्तीवरही पहिला हक्क मुलींचाच असतो, ज्यामुळे महिला घराच्या खऱ्या मालकिणी असतात आणि त्यांचं महत्त्व अधिक वाढतं. मेघालयातील गारो आणि जयंतिया यांसारख्या इतर आदिवासी जमातींमध्येही अशाच मातृसत्ताक परंपरा दिसून येतात, ज्या या प्रदेशाची सांस्कृतिक विविधता दर्शवतात.
खासी समाजात मुलगा जन्माला येण्यापेक्षा मुलगी जन्माला आल्याचा आनंद जास्त मोठा असतो आणि तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुलीला कुटुंबाचा आधारस्तंभ मानले जाते. या लोकांना संगीताची आणि कलेची खूप आवड आहे. त्यांचे जीवन आणि संस्कृती संगीताने भारलेली आहे. त्यांच्या पारंपरिक वाद्यांमध्ये गिटार, बासरी आणि ड्रमचा समावेश असतो, जे ते आनंदाच्या प्रसंगी वाजवतात. त्यांच्या उत्सवांमध्ये आणि समारंभांमध्ये संगीताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे, जे त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. खासी जमात निसर्गाशी एकरूप होऊन जगते आणि त्यांच्या परंपरा पर्यावरणाशी जोडलेल्या आहेत.