कोलकाता हिंसाचार : तीन दिवस आधीच प्रचार बंद करा, निवडणूक आयोगाचे आदेश

कोलकाता हिंसाचार : तीन दिवस आधीच प्रचार बंद करा, निवडणूक आयोगाचे आदेश

कोलकाता : पश्चिम बंगालमधील कोलकात्यात काल (14 मे) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान हिंसाचार झाला. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर पावलं उचलली आहेत. पश्चिम बंगालमध्ये 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. 17 मे रोजी संध्याकाळी प्रचार थांबण्याऐवजी 16 मे रोजीच प्रचार थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अमित शाह यांच्या रोड शोमध्ये हिंसाचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 9 मतदारसंघात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधीच म्हणजे 17 मे रोजी संध्याकाळी प्रचार थांबवणं बंधनकारक होतं. मात्र, कोलकात्यातील कालचा (14 मे) हिंसाचार पाहता, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील प्रचार 16 मे रोजी रात्री 10 वाजताच थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

19 मे रोजी पश्चिम बंगालमधील डमडम, बरासत, बसिऱ्हाट, जयनगर, मथुरापूर, जादवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण कोलकाता आणि उत्तर कोलकाता या मतदारसंघातील प्रचार 16 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

शिवाय, आज संध्याकाळपासूनच पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा आणि रोड शो सुद्धा बंद करण्यात आले आहेत. तसेच, दारु विक्रीवरही बंदी आणण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाचे हे सर्व आदेश मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू राहतील, असेही आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि गृह सचिवांना पदावरुन हटवण्यात आले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI