
तुम्ही अनेकदा पोलीसांनी हॉटेलवर छापा टाकून जोडप्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या वाचल्या असतील. अशा बातम्यांमुळे अनेकदा अविवाहित जोडप्यांच्या मनात अशी भीती असते की हॉटेलमध्ये गेल्यानंतर पोलीस छापा टाकतील आणि आपल्याला ताब्यात घेतील. मात्र पोलीस अशी धाड टाकून जोडप्याला त्रास देऊ शकतात का? त्यांना अटक करू शकतात का? याबाबत अनेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतचे कायदे काय आहेत याची माहिती देणार आहोत.
आपल्या देशाच्या संविधानात सर्व नागरिकांना गोपनीयतेचा अधिकार देण्यात आला आहे. यात अविवाहित जोडप्यांचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये गेलेले जोडपे प्रौढ असेल आणि त्यांनी पूर्वी कोणताही गुन्हा केलेला नसेल तर पोलीसांना अशा जोडप्याला हॉटेलमधून अटक करण्याचा अधिकार नाही. कारण भारतीय संविधानातील कलम 21 नुसार, प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगण्याचा आणि गोपनीयतेचा अधिकार आहे.
या कलमानुसार, जर एखादे अविवाहित जोडपे संमतीने हॉटेलमध्ये राहत असेल आणि याआघी त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नसेल, तर पोलीस त्यांना त्रास देऊ शकत नाहीत. मात्र हॉटेलमध्ये राहणाऱ्या जोडप्यापैकी एकाने आरोप केला किंवा पोलीसांना दिलेले विधान वारंवार बदलले तर त्यांना अटक केली जाऊ शकते. यात जर ते दोषी आढळले तर त्यांना दीड वर्षांसाठी जेलवारी होऊ शकते. मात्र जर या जोडप्याने योग्य ओळखपत्र देऊन जर रूम बूक केली असेल तर पोलीस अशा जोडप्याला त्रास देऊ शकत नाही.
तुमच्यापैकी जर कोणी हॉटेलमध्ये राहत असेल तर आणि पोलीसांनी जर हॉटेलवर छापा टाकला आणि तुम्हाला अटक करण्याची धमकी दिली तर तुम्ही पोलीसांकडे अटक करण्याचे लेखी कारण मागू शकता. तसेच या परिस्थितीत तुम्ही पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओही रेकॉर्ड करू शकता. असे करूनही पोलीसांकडून त्रास दिला जात असेल तर तुम्ही त्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू शकता. तसेच अनेक पोलीस तुमच्या पालकांना फोन करण्याची धमकी देऊ शकतात, अशावेळी तुम्ही प्रौढ आहात याचा पुरावा सादर करून संमतीने इथे आलो आहोत असं त्यांना सांगू शकता.
दिल्ली उच्च न्यायालयाने 2009 साली प्रौढ जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा अधिकार आहे असा निर्णय दिला होता. 2013 साली मद्रास उच्च न्यायालयानेही कोणताही कायदा अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये राहण्यापासून रोखू शकत नाही असं विधान केले होते. तसेच 2019 मध्येही मद्रास उच्च न्यायालयाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नसून अशा जोडप्यांना हॉटेलमध्ये राहता येते असा निर्णय दिला होता.