मोठी बातमी! ‘या’ दिवसापासून जातीय जनगणना सुरु होणार, तारीख आली समोर

जातीय जनगणनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना २ टप्प्यात केली जाणार आहे. प्रथम ४ राज्यांमध्ये जातीय जनगणना सुरू होईल.त्यानंतर उर्वरित राज्यांमध्ये ही जनगणना पार पडेल.

मोठी बातमी! या दिवसापासून जातीय जनगणना सुरु होणार, तारीख आली समोर
| Updated on: Jun 04, 2025 | 6:56 PM

जातीय जनगणनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जातीय जनगणना २ टप्प्यात केली जाणार आहे. प्रथम ४ राज्यांमध्ये जातीय जनगणना सुरू होईल. पहिल्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जात जनगणना केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जातीय जनगणना सुरू होणार आहे.

याआधीही दोन टप्प्यात होणार होती जनगणना

२०२१ ची जनगणना देखील दोन टप्प्यात होणार होती, पहिला टप्पा एप्रिल-सप्टेंबर २०२० दरम्यान आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२१ मध्ये आयोजित केला जाणार होता. २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनगणना पुढे ढकलावी लागली होती. आता ती 2027 मध्ये केली जाणार आहे.

९४ वर्षांनंतर जातीय जनगणनेचा निर्णय

१९३१ नंतर भारतात जातीय जनगणना झालेली नाही. मात्र आता ९४ वर्षांनंतर, मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच्या जनगणनेत अनुसूचित जाती-जमातींच्या लोकसंख्येचा डेटा आहे, परंतु ओबीसींचा नाही, ज्यामुळे आरक्षण देताना अडचण निर्माण होते.

जातीय जनगणना म्हणजे काय?

जातीय जनगणना ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये देशाच्या किंवा प्रदेशातील लोकसंख्येचे सर्वेक्षण करून विविध जाती आणि सामाजिक गटांची संख्या, सामाजिक-आर्थिक स्थिती आणि इतर माहिती गोळा केली जाते. याचा वापर देशातील विविध धोरणे आणि योजना राबविण्यासाठी केला जातो. यामुळे जनतेला मोठा फायदा होतो आणि सरकारलाही धोरणे आखण्यासाठी मदत मिळते.

जातीय जनगणनेचे फायदे काय आहेत?

जातीय जनगणना केल्याने राज्यात किंवा देशात कोणत्या समाजाचे किंवा जातीचे किती लोक आहेत याची माहिती मिळते. त्यानंतर सरकार त्यानुसार योजना बनवते. या जनगणनेमुळे मागासलेल्या समुदायांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यास मदत होते, त्यामुळे त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होते.