CDS Act : मोदी सरकारकडून सीडीएस कायद्यात मोठा बदल, आता थ्री स्टार अधिकाऱ्यालाही ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ होता येणार

केंद्र सरकारने हवाई दलात कार्यरत असणाऱ्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला संधी देण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यासाठी केंद्र सरकारकडून वायू सेनेच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत.

CDS Act : मोदी सरकारकडून सीडीएस कायद्यात मोठा बदल, आता थ्री स्टार अधिकाऱ्यालाही चीफ ऑफ आर्मी स्टाफ होता येणार
Air Force
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 07, 2022 | 5:26 PM

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defense Staff) कायद्यात मोठा बदल केलाय. आता हवाई दलातील थ्री स्टार अधिकाऱ्यालाही सीडीएस होता येणार आहे. केंद्र सरकारने हवाई दलात कार्यरत असणाऱ्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला (Air Chief Marshal) संधी देण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. त्यासाठी केंद्र सरकारकडून वायू सेनेच्या (Air Force) नियमावलीत बदल करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सीडीएस होण्यासाठी एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला वयाची अट असणार आहे. त्यांचे वय 62 पेक्षा अधिक असता कामा नये, असं सरकारच्या गॅझेट अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

संरक्षण मंत्रालयाने सोमवारी वायू दल कायदा 1950 च्या सेक्शन 190 अंतर्गत येणाऱ्या एअरफोर्स रेग्युलेशन 1964 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानंतर तातडीने त्याची गॅझेट अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार वायू सेनेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त एअर मार्शल आणि एअर चीफ मार्शलला सीडीएस होता येणार आहे. त्यासाठी त्यांचं वय 62 पेक्षा अधिक असू नये. तर सीडीएसचा कार्यकाळ 65 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

5 महिन्यांपासून सीडीएस पद रिक्त

देशाचे पहिले सीडीएस जनरल बीपिन रावत यांचा 8 डिसेंबरला एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हा पासून सीडीएस हे संरक्षण दलातील अत्यंत महत्वाचं पद रिक्त आहे. केंद्र सरकारकडून हे पद भरण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचं वारंवार सांगितलं गेलं. मात्र, अद्याप सीडीएसची नियुक्ती झालेली नाही.

सीडीएस – लष्करातील सर्वात मोठे पद

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद लष्करातील सर्वात मोठ्या पदांपैकी एक आहे आणि त्यामुळे सरकार आणि संरक्षण दलांच्या कामकाजात अधिक समन्वय राखला जातो. आधुनिकीकरण प्रकल्प, पदोन्नती इत्यादींना मान्यता देण्यासाठी देशातील संरक्षण दल पूर्वी नोकरशाहीतून जात असे, परंतु लष्करी व्यवहार विभाग स्थापन झाल्यापासून ही सर्व कामे लष्कराच्या अखत्यारीत आली. तिन्ही दलांमधील लष्करी मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्याचे कामही सीडीएसला देण्यात आले आहे. थिएटर कमांड सारख्या नवीन युगातील युद्धापासून ते सशस्त्र दलांच्या शस्त्रास्त्रांच्या स्वदेशीकरणाची जबाबदारी देखील CDS वर आहे.