चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून ! बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट

राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष दिल्यास एव्हीयन फ्लूचा प्रसार रोखण्यात मदत होईल, असे केंद्राने म्हटले आहे.

चिकन खाणाऱ्यांनो जरा सांभाळून ! बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट
बर्ड फ्लू
Image Credit source: TV9 Gujrati
| Updated on: Mar 10, 2025 | 10:38 AM

केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने बर्ड फ्लू (H5N1) संदर्भात पंजाबसह 9 राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूने भारतात प्रवेश केला आहे जे लोक संक्रमित चिकन खातात त्यांना विषाणूची लागण होऊ शकते, असे मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

‘जानेवारी 2025 पासून, सरकारी मालकीच्या पोल्ट्री फार्मसह 9 राज्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सर्व सरकारी, व्यावसायिक आणि घरामागील कुक्कुटपालनांना जैवसुरक्षा उपाय मजबूत करावे लागतील.’ असे मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.

सर्व शासकीय पोल्ट्री फार्मचे जैवसुरक्षा लेखापरीक्षण लवकरात लवकर करून त्यात उणिवा तातडीने दूर करण्यात याव्यात, असे केंद्र शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे कठोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि असामान्य मृत्यूची वेळेवर अहवाल देण्यासाठी पोल्ट्री फार्म कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम सुरू केले जावेत, असेही त्यात नमूद करण्यात आलं आहे. राज्यांनी एव्हीयन इन्फ्लूएन्झाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं आहे. त्या अंतर्गत जलद प्रतिसाद पथके सक्रिय करा आणि पशुवैद्यकीय आणि प्रयोगशाळांची संख्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष दिल्यास एव्हीयन फ्लूचा प्रसार रोखण्यात मदत होईल, असे केंद्राने म्हटले आहे.

बर्ड फ्लूचे लक्षण

बर्ड फ्लूची लक्षणे विशेषत: H5N1 सारख्या स्ट्रेनची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, पण बहुतेक वेळा ती सामान्य इन्फ्लूएंझा सारखीच असतात. डोळे लाल होणं, ताप, खोकला, थकवा, स्नायूंमध्ये वेदन, गळ्या खवखव, मळमळ, उलटी , जुलाब, गॅस्ट्रोचा त्रास, नाक बंद होणं, श्वास घेण्यास त्रास अशी बर्ड फ्लूची लक्षणं जाणवू शकतात.

बर्ड फ्लूचा संसर्ग कसा होतो?

बर्ड फ्लू, किंवा एव्हीयन इन्फ्लूएन्झा, हा प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करते, परंतु विशिष्ट परिस्थितीत मानवांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. संक्रमित पक्षी किंवा दूषित वातावरणाच्या थेट संपर्कात आल्याने हा विषाणू पसरतो. ज्या व्यक्ती संक्रमित पक्षी हाताळतात किंवा पोल्ट्री फार्मशी जवळच्या संपर्कात असतात त्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा होऊ शकतो. नीट न शिजवलेले चिकन खाल्ल्यानेही हा विषाणू संसर्ग माणसांमध्ये पसरू शकतो.

बर्ड फ्लू प्रतिबंधात्मक उपाय

पक्ष्यांना स्पर्श केल्यानंतर किंवा बर्ड फ्लूचे विषाणू असलेल्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपले हात नेहमी साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा. एव्हीयन इन्फ्लूएन्झाच्या संपर्कात असलेल्या प्राण्यांशी संपर्क टाळा. बर्ड फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वैद्यकीय मदत घ्या. चिकन आणि अंडी व्यवस्थित शिजवून खा. गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लूची लस घ्या.