Monkeypox : देशात आता मंकीपॉक्सची दहशत; केंद्र सरकार अॅलर्ट; विमानतळ, बंदरांवर परदेशी प्रवाशांची स्क्रिनिंग

| Updated on: Jul 19, 2022 | 1:37 AM

केंद्राने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर पॉइंट्स ऑफ एंट्रीच्या आवारातील (POE) आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. त्या बैठकीनंतर विमानतळ आणि बंदरांवर स्क्रीनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Monkeypox : देशात आता मंकीपॉक्सची दहशत; केंद्र सरकार अॅलर्ट; विमानतळ, बंदरांवर परदेशी प्रवाशांची स्क्रिनिंग
मंकीपॉक्स
Image Credit source: Twitter
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना विषाणू पाठोपाठ मंकीपॉक्स (Monkeypox)च्या संसर्गाने संपूर्ण देशाची चिंता वाढवली आहे. या संसर्गाचा दुसरा रुग्ण (Patients) केरळमध्ये आढळला असून त्यामुळे केंद्र सरकार (Central Government) सतर्क झाले आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ तसेच प्रमुख बंदरांवर कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. संशयित रुग्णांची तातडीने वैद्यकीय चाचणी केली जात असून त्या चाचण्यांचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जात आहे. चीनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे देशाला नव्या लाटेची भिती सतावत आहे. त्यातच मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण काही दिवसांतच सापडल्यामुळे धोक्याची घंटा वाजली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केरळसह सर्वच राज्यांना खबरदारीच्या नव्या सूचना जारी केल्या आहेत.

उच्चस्तरीय बैठकीत आरोग्य सुविधांचा आढावा

केंद्राने आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरांवर पॉइंट्स ऑफ एंट्रीच्या आवारातील (POE) आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. त्या बैठकीनंतर विमानतळ आणि बंदरांवर स्क्रीनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मंकीपॉक्सचे रुग्ण वेळेत ओळखून त्यांच्यावर उपचार करता येतील. या उच्चस्तरीय बैठकीला विमानतळ आणि बंदरांवरील आरोग्य अधिकारी तसेच प्रादेशिक कार्यालयांचे प्रादेशिक संचालक देखील उपस्थित होते. मंकीपॉक्स रोगाचा धोका कमी करण्यासाठी राज्ये, विमानतळ आणि बंदरांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘मंकीपॉक्स रोगाच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार मंकीपॉक्स रोगाचे क्लिनिकल व्यवस्थापन आणि उपचारांचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बंदरे आणि विमानतळांवर इमिग्रेशनसारख्या इतर एजन्सीशी समन्वय साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर एखाद्याला संसर्ग झाल्याचे आढळल्यास वेळेवर संदर्भ देण्यासाठी आणि त्याला विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी बंदर आणि विमानतळासाठी रुग्णालय सुविधा आहेत की नाही याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण

देशात सोमवारी मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात दुबईहून आलेल्या 31 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. याआधीही केरळमध्येच या रोगाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसरा रुग्ण कन्नूरचा रहिवासी आहे. त्याच्यावर परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Central government on alert after second case of monkeypox was found in the country)