
Chhangur Baba Personal Life : उत्तर प्रदेशच्या बलरामपुरमध्ये अवैध धर्मांतराचे नेटवर्क चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्यासंदर्भात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बलरामपुल पोलिसांनी छांगूर बाबा आणि नीतू उर्फ नसरीन यांना अटक केली आहे आणि त्यांना 7 दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे.एकेकाळी भीक मागणाऱ्या बाबाची परदेशी निधीतून कमावलेली सुमारे ३०० कोटी रुपयांची मालमत्ता आहेसेही तपासात समोर आले. त्यामुळे त्याच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप देखील लावण्यात आले आहेत. छांगुर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांची 40 हून अधिक बँक खाती सापडली आहेत. या खात्यांमधून सुमारे 100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. बाबाने अनेक इस्लामिक देशांमध्ये प्रवास केला आहे. बाबाच्या मालमत्तेची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) सोपवण्यात आली आहे. चौकशी आणि तपासादरम्यान, एटीएसला बाबाविरुद्ध अनेक पुरावे सापडले आहेत. पोलिसांना छांगूर बाबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दलही माहिती मिळाली आहे.
छांगूर बाबाच्या कोठीत काय सापडलं ?
छांगूर बाबाने सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे एक आलिशान हवेली बांधली होती, 5 जुलै रोजी बाबाच्या अटकेनंतर ती बुलडोझर वापरून पाडण्यात आली. मात्र ती जमीनदोस्त करण्यापूर्वी, घराच्या आत एक शोध मोहीम राबवण्यात आली ज्यामध्ये आलिशान कार, विदेशी प्राणी, उच्च-रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज नियंत्रण कक्ष, सीक्रेट मीटिंग रूम, आणि सीक्रेट बेडरूम असं बरंच काही आढळलं.
बाबा छांगूरचा हवेली आतून खूप रहस्यमय होती. हवेलीच्या आत एक सीक्रेट मीटिंग रूम सापडली, ज्यामध्ये परदेशातून आयात केलेले मोठे सोफे होते. या बैठकीच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले होते. बंगल्याच्या आत अनेक खोल्या होत्या, त्यापैकी एक सीक्रेट बेडरूम होती, ज्यामध्ये कोरीव काम केलेले बेड, गाद्या आणि पडदे आढळले होते. खोलीच्या आत उत्कृष्ट लायटिंग करण्यात आली होती.
एवढंच नव्हे तर छांगून बाबाच्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी स्पेनमधून आयात केलेले तेलही त्याच बेडरूममध्ये सापडलं. ताकद वाढवणाऱ्या गोळ्यांची पाकिटे सापडली. बेडरूममध्येच एक स्टोअर रूम बनवण्यात आली होती, ज्यामध्ये तेल लपवून ठेवण्यात आले होते. घरात उर्दू लेबल असलेली दैनंदिन वापराची उत्पादनेही सापडली. दुबईत बनवलेले परफ्यूम आणि सुगंधित आंघोळीचा साबणही या झडतीदरम्यान आढळला.
या महिला बाबांच्या निशाण्यावर
छांगूर बाबाने आत्तापर्यंत सुमारे 4 हजार लोकांचे धर्मांतर केले आहे, ज्यात 1500 हून अधिक महिलांचा समावेश आहे. गर्भवती राहू न शकणाऱ्या महिला, गरीब, विधवा आणि मानसिकदृष्ट्या आजारी महिला अशी लोकं त्यांच्या निशाण्यावर होती, ज्यांना त्या बाबाने आमिष दाखवून धर्मांतरित केले होते. आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेट तयार करणे हे बाबाचे उद्दिष्ट होते, ज्यासाठी त्याने भारत-नेपाळ सीमेवर इस्लामिक औषध केंद्र बांधण्याची तयारी सुरू केली होती.
छांगूर बाबाच्या कुटुंबात कोण कोण ?
पोलिस सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की चांगूर बाबा विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव कुतुबुनिशा आहे. त्यांना 4 मुली आणि एक मुलगा आहे. मुलींची नावे शबनम, साहिबा, सुमौना, चटकाना आहेत. मुलाचे नाव मेहबूब आहे. बाबा 2020 मध्ये कोरोना काळात मुंबईत आला होता. सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांच्या दर्ग्यावर त्याची नीतू आणि तिचे पती नवीन यांची भेट झाली. या दोघांच्या माध्यमातून छांगूर बाबाने धर्मांतराचा व्यवसाय सुरू केला.