
Shankaracharya Clash : प्रयागराजमध्ये सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आले आहे. येथे मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यावरून ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रयागराजमधील माघ मेळा प्रशासन यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्याच्या ठिकाणी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी थेट आंदोलन करत माघ मेळा प्रशासनाने माफी मागावी अशी मागणी केली. अजूनही अविमुक्तेश्वरानंद यांचे आंदोलन चालू आहे. असे असतानाच आता हा वाद जास्तच पेटत असल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार माघ मेळा प्राधिकरणाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना थेट नोटीस बजावली आहे. तुम्ही शंकराचार्य कसे आहात? हे सिद्ध करा, असे आव्हान या नोटिशीत देण्यात आले आहे. या नोटिशीनंतर अविमुक्तेश्वरानंद चांगलाचे भडकले असून आता मी शंकराचार्य आहे की नाही हे देशाचे राष्ट्रपती ठरवणार का? असा संतप्त सवाल केला आहे. त्यामुळे आता भविष्यात हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्यापासून रोखल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद आंदोलनाला बसले आहेत. माघ मेळा प्रशासनाने माझी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर माघ मेळा प्रशासानने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत तुम्ही शंकराचार्य कसे आहात? हे सिद्ध करा, असे म्हणत नोटीस दिली आहे. अविमुक्तेश्वरानंद यांना 24 तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. असे असतानाच आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील द्वारका पीठ आणि श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य मी शंकराचार्य असल्याचे मानतात. गेल्या माघ मेळ्यात दोन्ही शंकराचार्यांनी मला सोबत घेऊन स्नान केले आहे. श्रृंगेरी आणि द्वारकेचे शंकराचार्य मला शंकराचार्य मानतात. असे असेल तर मग आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे, अशी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी घेतली आहे.
तसेच पुढे बोलताना आता मी शंकराचार्य आहे की नाही हे प्रशासन ठरवणार का? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा भारताचे राष्ट्रपती आता शंकराचार्य कोण आहेत, हे ठरवतील का? असे थेट प्रश्नच त्यांनी केले आहेत सोबतच शंकराचार्य ठरवण्याचा भारताच्या राष्ट्रपतीलाही अधिकार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.