सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलेंडरचे दर घसरले, हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार?
LPG Cylinder Price: जून महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी करताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

LPG Cylinder Price: देशभरातील नागरिकांना जून महिन्याच्या पहिल्या दिवशी दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति गॅस सिलिंडर 80 रुपयांपेक्षा जास्त कपात आहे.
देशभरातील महानगरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1900 रुपयांपेक्षा जास्त नाही.व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत कमी करताना घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत यापूर्वी 8 एप्रिल रोजी बदल करण्यात आला होता. त्यावेळी सर्वच ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
चारही महानगरांमध्ये काय असतील दर?
देशातील चारही महानगरांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताच बदल झाला नाही. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर 853 रुपये आहे. कोलकोतामध्ये 879 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 852.50 रुपये तर चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे. दुसरीकडे व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत बदल झाल्यानंतर दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 1723.50 रुपयांना मिळणार आहे.
तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबाचालकांना दिलासा मिळणार आहे. या दर कपातीनंतर हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार का? याकडे खवय्यांचे लक्ष लागले आहे. कारण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घसरण किंवा वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावर होतो. शेवटी तो परिणाम ग्राहकांवर होतो.
व्यावसायिक गॅस सिलेंडरसोबत विमानांसाठी लागणाऱ्या एविएशन टर्बाइन फ्यूलच्या दरात कपात झाली आहे. हे दर 4.4 टक्क्यांनी कमी झाले आहे. विमानाच्या इंधनाच्या कपातीचा फायदा ग्राहकांना मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे. कारण विमान वाहतूक कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी 30 टक्के खर्च इंधनावर होतो. यामुळे विमानांच्या तिकिटांचे दरही कमी होण्याची अपेक्षा आहे.
