व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका मिळाली नाही, कोरोनामुळे NSG ग्रुप कमांडरचा मृत्यू

| Updated on: May 06, 2021 | 5:21 PM

राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग झालेल्या नॅशल सिक्युरिटी गार्डचे ग्रुप कमांडर बिरेंद्र कुमार झा यांचा व्हेंटिलेटर आणि अद्ययावत रुग्णवाहिका न मिळाल्याने बुधवारी (5 मे) मृत्यू झालाय.

व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका मिळाली नाही, कोरोनामुळे NSG ग्रुप कमांडरचा मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा सामना करण्यासाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. कुठं ऑक्सिजनचा तुटवडा आहे, कुठं औषधंच मिळत नाहीयेत, तर कुठं बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागलेत. अशातच आता राजधानी दिल्लीत कोरोना संसर्ग झालेल्या नॅशल सिक्युरिटी गार्डचे ग्रुप कमांडर बिरेंद्र कुमार झा यांचा व्हेंटिलेटर आणि अद्ययावत रुग्णवाहिका न मिळाल्याने बुधवारी (5 मे) मृत्यू झालाय. वैद्यकीय सुविधांच्या अभावी NSG कमांडरची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. इतक्या NSG च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच सुविधा उपलब्ध होत नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न विचारला जात आहे (Corona death of NSG group commander Brijendra Kumar Jha in Delhi due to Ventilator Ambulance shortage).

54 वर्षयी एनएसजी ग्रुप कमांडर बी. के कुमार यांना 19 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग झाला. यानंतर त्यांना नोएडामधील सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेसच्या (CAPF) रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस त्यांची प्रकृती स्थीर होती मात्र 4 मे रोजी रात्री त्यांची तब्येत बिघडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमांडो कुमार यांची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची शिफारस केली. मात्र, रुग्णालयातील दोन्ही व्हेंटिलेटर निकामी होते. त्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयाशी संपर्क करण्यात आला. मात्र, तेथेही व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकत नाही, असं उत्तर आलं.

यानंतर NSG ने नोएडातील फोर्टिस रुग्णालयाशी संपर्क केला. तेथे व्हेंटिलेटर उपलब्ध झालं. मात्र, त्यांना त्या रुग्णालयात शिफ्ट करण्याचं मोठं आव्हान होतं. CAPF रुग्णालयाकडे अद्ययावत रुग्णवाहिका नव्हती. फोर्टिस रुग्णालयाकडे देखील अशी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. या सर्व गोष्टींमध्ये वेळ जात होता. म्हणून अखेरिस एनसजीने त्या स्थितीत उपलब्ध असलेल्या अॅडव्हान्स कार्डियाक लाईफ सपोर्ट अॅम्बुलन्सच्या मदतीने कुमार यांना फोर्टिस रुग्णालयात हलवले. मात्र, मध्येच कार्डियाक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका अडीच वाजता पोहचली, मात्र, 3 वाजता कमांडो कुमार यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले मात्र ते कुमार यांना वाचवू शकले नाही. कोरोना विषाणूमुळे भारताच्या दहशतवादी विरोधी कमांडो दलातील हा पहिला मृत्यू असल्याचं बोललं जातंय. एनएसजीच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण 549 कमांडोंना संसर्ग झाल्याचं समोर आलंय. यातील 59 जण सध्या सक्रीय आहेत.

हेही वाचा :

चक्क स्मशानभूमीबाहेर ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड; कोरोनानं परिस्थिती चिघळली

कोरोनाशी मुकाबल्यासाठी सशस्त्र दलांकडून ‘को-जीत’ मोहीम, मराठमोळ्या माधुरी कानिटकरांकडे नेतृत्व

कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?; तज्ज्ञांनी सांगितली ‘ही’ डेडलाईन

व्हिडीओ पाहा :

Corona death of NSG group commander Brijendra Kumar Jha in Delhi due to Ventilator Ambulance shortage