Cyclone Warning : अर्णव चक्रीवादळाचा हाहा:कार, त्सुनामी सारख्या उंच लाटा, समुद्राचं पाणी रस्त्यावर, रात्री 2 वाजल्यानंतर…
महाभयानक अर्णव चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे, त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशात जोरदार तयारी सुरू आहे. विशाखापट्टणमजवळ पहाटे भूस्खलन होण्याची भीती आहे, तर 150 किमी/तास वेगाने वारे वाहतील. तामिळनाडूमध्ये त्सुनामीसारख्या उंच लाटांनी समुद्राचे पाणी रस्त्यावर आले आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, रेल्वे-विमान सेवा विस्कळीत झाली आहे.

महाभयानक अर्णव चक्रीवादळ आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याला धडक देणार आहे. त्यामुळे या वादळाचा सामना करण्यासाठी केवळ आंध्र प्रदेशातच नव्हे तर ओडिशातही जोरदार तयारी करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उद्या बुधवारी पहाटे 2 ते 4 वाजेच्या दरम्यान विशाखापट्टणमजवळ मोठं भूस्खलन होणार आहे. यावेळी 125 ते 135 ताशी प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. हा वेग 150 ताशी प्रति किलोमीटरपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे वादळ आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीजवळ वेगाने येत आहे. त्यामुळे तामिळनाडूचं हवामानही बदललं आहे. तामिळनाडूत समुद्र खवळला असून समुद्रात त्सुनामी सारख्या लाटा उसळत आहेत. समुद्राचे पाणी रस्त्यावर आल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेशच नाही तर तामिळनाडूचं हवामानही बदललं आहे. तामिळनाडूच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तामिळनाडूची एन्नोर किनारपट्टी आणि चेन्नई शहराच्या काही भागात समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे संकट अधिक गडद झाल्याचे संकेत मिळत आहेत.
हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. गेल्या सहा तासांपासून वादळ सरासरी ताशी प्रति 18 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. आंध्र प्रदेशात उद्या सकाळी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशाला हाय अलर्ट देण्यात आला आहे.
नागरिकांचे स्थलांतर
चक्रीवादळाच्या भीतीने दोन्ही राज्यातील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. रेल्वेने अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत. तर विजयवाडा आणि विशाखापट्टणम विमानतळावरील विमान सेवांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. ओडिशाच्या 16 जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळाच्या धडकण्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या अनेक भागात प्रचंड पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण 24 परगना आणि पूर्व मेदिनीपूरमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. झारग्राम, पश्चिम मेदिनीपूर, हावडा आणि कोलकाताच्या काही ठिकाणी पाऊस झाला आहे.
विजेचे खांब कोसळले
चक्रीवादळामुळे आतापासूनच विशाखापट्टणममध्ये वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या ठिकाणचे विजेचे खांब उलथले आहेत. तसेच वृक्ष उन्मळून पडले आहेत. अधिकारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा आणि रस्त्यावर पडलेले वृक्ष हटवण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत.