दित्वा चक्रीवादळाचा राज्यात कुठे अन् काय परिणाम? श्रीलंकेत आणीबाणी

भारतीय हवामाना खात्याने चेन्नई, कुड्डालोर आणि तमिळनाडूच्या इतर भागात पावसाचा इशारा दिला आहे. तर एअर इंडियाने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांत्या विमानांची स्थिती तपासण्याचं आवाहन केलं आहे.

दित्वा चक्रीवादळाचा राज्यात कुठे अन् काय परिणाम? श्रीलंकेत आणीबाणी
Cyclone Ditwah
| Updated on: Nov 30, 2025 | 10:39 AM

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दित्वा चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेची किनारपट्टी आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दित्वा चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने आगेकूच करत आहे. ‘दित्वा’ हे चक्रीवादळ तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येत आहे. या वादळामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. तसंच काही भागांत हलक्या सरींची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह काही भागांतील तापमानात घट झाली आहे. विदर्भातही काही भागांत तापमानात दिलासा मिळाला आहे. तर राज्यातील इतर काही भागांत तापमानातील वाढ कायम आहे.

तमिळनाडू, आंध्र प्रदेशलाही ‘दित्वा’चा तडाखा

‘दित्वा’मुळे तमिळनाडूमध्ये शनिवारी दक्षिण किनारपट्टी आणि कावेरी नदीभोवतीच्या जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला. तर 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान आंध्र प्रदेशच्या काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.

श्रीलंकेत आणीबाणी

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘दित्वा’ या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात जीवित तसंच मालमत्तेची हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. श्रीलंकेत किमान 153 लोकांचा मृत्यू झाला असून 191 जण बेपत्ता आहेत.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी महसूल, पोली, मत्स्यव्यवसाय, आरोग्य आणि स्थानिक संस्थांसह सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. विल्लुपुरम, कुड्डालोर, तिरुवन्नमलाई, नागापट्टिनम, मयिलादुथुराई, रामनाथपुरम, तिरुवरुर, तंजावर आणि पुड्डुक्कोटाई यांसारख्या किनारी आणि आसपासच्या जिल्ह्यांनादेखील अतिवृष्टीचा धोका आहे.

रेल्वेमंत्र्यांकडून आढावा

रेल्वे सेवांमध्ये व्यत्यय येऊ नये आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी घेतला.

चक्रीवादळाला ‘दित्वा’ हे नाव कसं मिळालं?

‘दित्वा’चा अर्थ समुद्रकिनारा असा होतो. येमेन या देशाने चक्रीवादळ नामकरण प्रणालीअंतर्गत हे नाव सुचवलं होतं. हे नाव येमेनमधील सोकोट्रा बेटावर असलेल्या डेटवा लगूनवरून आलं आहे. हे ठिकाण त्याच्या दुर्मिळ आणि आकर्षक किनाऱ्यासाठी ओळखलं जातं.