दाऊद इब्राहिमला व्हायचं होतं सरेंडर, काय होत्या अटी, माजी आयपीएस अधिकाऱ्याचा सर्वात मोठा खुलासा

मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या दाऊद इब्राहिम संदर्भात माजी आयपीएस अधिकाऱ्याने मोठा खुलासा केला आहे. दाऊद इब्राहिमला शरण यायचं होतं. त्याच्याशी फोनवर बोलणं सुद्धा झालं होतं, असं त्यांनी म्हटलं.

दाऊद इब्राहिमला व्हायचं होतं सरेंडर, काय होत्या अटी, माजी आयपीएस अधिकाऱ्याचा सर्वात मोठा खुलासा
Dawood Ibrahim
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 4:15 PM

भारताच्या इतिहासामधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला 1993 मध्ये मुंबईत झाला. या हल्ल्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो नागरीक जखमी झाले होते. दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन हे मुंबई बॉम्बस्फोटाचे मुख्य सूत्रधार होते. दरम्यान या हल्ल्याचा तपास त्यावेळी माजी कमिश्नर आणि आयपीएस अधिकारी नीरज कुमार हे करत होते. नुकतेच त्यांनी एका शोमध्ये बोलताना दाऊद इब्राहिम संदर्भात अनेक खुलासे केले आहेत. दाऊदला सरेंडर करायचं होतं, मात्र त्यासाठी त्याने काही अटी ठेवल्या होत्या, असं नीरज कुमार यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात मनीष लाला याच्या चौकशीसंदर्भात देखील त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नीरज कुमार यांचं अनेकदा दाऊद इब्राहिम सोबत फोनवर देखील बोलणं झालं होतं.

माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार शाहिद सिद्दीकी यांचा शो असलेल्या ‘आय विटनेस विद शाहिद’मध्ये बोलताना नीरज कुमार यांनी दाऊद इब्राहिम संदर्भात अनेक मोठे खुलासे केले आहेत. जेव्हा मी मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा तपास करत होतो, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आम्ही जेव्हा दाऊदचा निकटवर्तीय असलेल्या मनिष लालाच्या घरावर छापा मारला तेव्हा मनिष लाला हा सिंगापूरमध्ये होता. त्यानंतर तो जेव्हा मुंबईत परतला तेव्हा आम्ही त्याला एका प्रकरणात अटक केलं.

Loading...

मनीष लाला यानेच एका सीक्रेट टेलीफोनच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमसोबत माझं बोलणं करून दिलं होतं. यावेळी दाऊदने मला अनेक प्रश्न विचारले. त्याने मला म्हटलं की, तुम्हाला वाटतं का की खरच मी मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. जर असं असतं तर टायगर मेमनप्रमाणे मी देखील माझ्या कुटुंबाला तिथून हटवलं असतं, परंतु मी असं केलं नाही, असं दाऊद याने नीरज कुमार यांना फोनवर म्हटलं होतं. दरम्यान दाऊद याने सरेंडर होण्याची तयारी दाखवली होती, परंतु त्याच्या काही अटी होत्या, त्या अटी पूर्ण करणं शक्य नव्हतं, त्यानंतर त्याच्याशी फोनवर बोलणं बंद झालं असं नीरज कुमार यांनी म्हटलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us