
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. कोर्टाने त्यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर शनिवारी निकाल दिलेला नाही. केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनाची मुदत उद्या 2 जून रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या त्यांना तिहार कारागृहात सरेंडर करावे लागणार आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी निवडणूक प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यांच्या जामीनाची मुदत 2 जूनला समाप्त होणार आहे, त्यामुळे त्यांना कारागृहात हजर व्हावे लागणार आहे.
केजरीवाल यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सात दिवस जामीनाची मुदत वाढविण्याची मागणी कोर्टाला केली होती. शनिवारी या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला. कोर्टात केजरीवाल यांच्यासाठी एन. हरिहरन आणि तपास यंत्रणा ईडीच्यावतीने एएसजी एस.व्ही.राजू यांनी काम पाहीले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे देखील या सुनावली ऑनलाईन युक्तीवाद केला. शुक्रवारी केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ते 2 जून रोजी सरेंडर करणार आहेत. त्यांनी आपण कोर्टाच्या आदेशाची वाट पाहू असे म्हटले नव्हते. अशा प्रकारची वक्तव्य करून ते कोर्टाची दिशाभूल करीत असल्याचा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) अरविंद केजरीवाल यांचे काही लाईव्ह व्हिडिओ कोर्टाला दाखवले. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरील आपला निर्णय 5 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. परंतू केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत उद्या 2 जून रोजी संपत आहे. त्यामुळे उद्या तिहार तुरुंगात त्यांना हजर व्हावे लागणार आहे.