साठ खासदारांची ‘वंदेभारत’ला आपआपल्या मतदार संघात चालविण्याची मागणी

भारताची सेमी बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसमुळे आरामदायी प्रवासाबरोबरच रेल्वे प्रवासात वेळची बचत होत आहे.

साठ खासदारांची वंदेभारतला आपआपल्या मतदार संघात चालविण्याची मागणी
VANDE BHARAT EXPRESS
Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 22, 2023 | 9:44 AM

नवी दिल्ली : आलिशान वंदेभारत एक्सप्रेस ( VANDEBHARAT ) सध्या मतदारांना भुलविण्यासाठीचे निवडणूकांतील आमीष ठरले आहे. सध्या देशभरात दहा वंदेभारत एक्सप्रेस सुरू असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे देशाच्या साठ खासदारांनी ( member of parliament ) आपआपल्या मतदार संघात वंदेभारत चालविण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे ( RAILWAYBOARD ) केली आहे. नुकतीच मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर – शिर्डी मार्गावर नववी आणि दहावी वंदेभारत ट्रेन सुरू आहे.

सीएसएमटी ते सोलापूर आणि साईनगर-शिर्डी अशा दोन वंदेभारतना अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. आता या गाड्यांना नव्वद ते शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेस चालविण्याची मागणी केली होती. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत देशातील साठ लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदार संघात वंदेभारत चालविण्याची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली आहे.

भारताची सेमी बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसंमुळे आरामदायी प्रवासाबरोबरच रेल्वे प्रवासात वेळची बचत होत आहे. आता देशाच्या साठ खासदारांना आपल्या मतदार संघात ही ट्रेन हवीच असा हट्ट रेल्वेकडे केला आहे. त्यात बिगर राजकीय ( राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन – राजग ) दलाचे 14  खासदारही देखील सामील आहेत.

वंदेभारतची मागणी करण्यात अर्थातच सत्ताधारी भाजपाचेच सर्वाधिक खासदारांचा समावेश आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पहिल्यांदा मुंबई ते सोलापूर वंदेभारतची मागणी केली होती. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी धारवाड ते बंगळूरू अशी वंदेभारतची मागणी केली आहे. तर नागरी हवाई उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी ग्वाल्हेरपर्यंत वंदेभारत हवी असे म्हटले आहे.

विरोधी पक्षातील खासदारांनी वंदेभारतची मागणी केली आहे, त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, जद ( यू ) , प्रत्येकी एका खासदाराने वंदेभारत चालविण्याची मागणी केली आहे. तसेच कॉंग्रेसच्या तीन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आणि वायएसआर कॉंग्रेसच्या एका खासदाराचीही हिच मागणी आहे. तसेच अन्य पक्षात शिवसेना आणि अपना दलाच्या प्रत्येकी एका खासदाराने वंदेभारत त्यांच्या मतदार संघात चालवावी असे म्हटले आहे.

पहिली वंदेभारत ट्रेन दिल्ली ते वाराणसी मार्गावर साल 2019 मध्ये चालविण्यात आली होती. तर सध्या देशभर दहा वंदेभारत सुरू आहेत. बिलासपूर ते नागपूर वंदेभारतला सध्याच्या आर्थिक वर्षांत जानेवारीपर्यंत किमान प्रवासी भारमान 55 टक्क्यांपर्यंत आहे. तर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मार्गावरील वंदेभारतला हे भारमान तब्बल 126  टक्के लाभले आहे. देशभरात 400  वंदेभारत चालविण्याची योजना असून या आलिशान ट्रेनचा कमाल वेग दरताशी 180  किमी इतका आहे.