आई-वडील, पत्नी, मुलांनाही समन्स, पण… TV9 च्या मंचावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भावनांना मोकळी करून दिली वाट

DCM DK Shivkumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी टीव्ही9 च्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट' मध्ये अनेक राजकीय खुलासा केले. त्यांचे आई-वडील, पत्नी आणि मुलांनाही समन्स पाठवण्यात आले. पण कायद्याने त्यांची बाजू घेतली. कायदेशीर लढाई त्यांनी जिंकली. आपण काँग्रेसचे शिस्तबद्ध सैनिक असल्याचे ते म्हणाले.

आई-वडील, पत्नी, मुलांनाही समन्स, पण... TV9 च्या मंचावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भावनांना मोकळी करून दिली वाट
डी. के. शिवकुमार कर्नाटक
| Updated on: Mar 25, 2026 | 10:59 AM

DCM DK Shivkumar at WITT: टीव्ही 9 नेटवर्कचा विचारांचा महामंच व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026 च्या दुसर्‍या दिवशी सत्ता संमेलनात मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी राजकीय खुलासे केले. आई-वडिल, पत्नी आणि मुलांनाही समन्स पाठवण्यात आले. माझ्या कुटुंबाची चौकशी झाली. 70 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. मला त्रास देण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. हा त्रास अजूनही कमी झालेला नाही. मी गेल्या 45 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. पण माझे कुटुंबिय एकदम बहादूर आहेत. निडर आहेत. मी राजकीय बळी ठरलो, इतकेच आता सांगू शकतो. माझ्याविरोधात कोणताच लाचलुचपतीचा गुन्हा नव्हता. मी एक शेतकरी आहे. त्यांना माझ्या घरी 40 लाख रुपयांव्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही.

हे सर्व राजकीय षडयंत्र होते. माझ्याविरोधात कोणतीच केस नव्हती. कोणताच आयोग नव्हता. काहीच हाती लागले नाही. पण त्यांनी मला कोर्टात खेचले. माझ्याविरोधात कर याचिका दाखल केल्या. पण देशातील कायद्याने मला निर्दोष मुक्त केले. मला माझ्या कुटुंबाची चिंता होती. पण त्यांनी जनतेला उत्तरं दिली. त्यांना माहिती होते की त्यांच्या वडिलांनी काहीएक चुकीचे केलेले नाही. कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी टीव्ही ९ नेटवर्कच्या सत्ता संमेलनात भावनांना वाट मोकळी करून दिली.

काँग्रेससाठी शिस्तबद्ध सैनिक

जेव्हा पक्षाला गरज असते, तेव्हा एक स्वयंशिस्त सैनिकाप्रमाणे काम करावे लागते. काँग्रेस येत्या काळात राष्ट्रीय स्तरावर मजबुतीने पुढे येईल. ती राजकीय क्षितिजावर पुन्हा डौलाने उभी राहिल असा विश्वास डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला. कोणत्याही लष्करात जर एखादा सैनिक थकलेला असेल तरीही त्याला लढावे लागते. त्याच्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याला देशासाठी, देश वाचवण्यासाठी लढावेच लागते. अगदी त्याच प्रमाणे मी माझ्या पक्षाचा सैनिक आहे. राजकीय नेत्यांना त्यांचे कुटुंबिय आणि खासगी जीवन यापेक्षा पक्षाच्या कामासाठी पुढे यावे लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य

आपल्या राजकीय करिअरविषयी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. कधी कधी मी रात्री 2 वाजेपर्यंत काम करतो. माझी जबाबदारी देश आणि राज्यातून येणार्‍या लोकांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा आणि अडचणी सोडवणे हे आहे. जेव्हा व्यवस्थेकडून त्यांच्या अडचणी दूर होत नाही, तोपर्यंत लोक नेत्यांकडे येत राहतात. त्यांना संतुष्ट करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे हे नेता म्हणून आमचं काम आहे, असे शिवकुमार म्हणाले.

डी.के. शिवकुमार कधी मुख्यमंत्री होणार असा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून विचारल्या जात आहे. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचा आरोपही होतो. गेल्या वर्षी तर डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याची चर्चाही होत होती. हाच प्रश्न त्यांना सत्ता संमेलनात विचारण्यात आला. त्यावर वेळ याचे उत्तर देईल असे ते म्हणाले. माझा पक्ष योग्य वेळी उत्तर देईल. मी माझे काम करत आहे. पक्ष जे काम देईल. ते मी विश्वासाने करत आहे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us