E20 इंधनामुळे वाहने खरंच बिघडतात का? नितीन गडकरींनी संसदेत दिलेले उत्तर काय?
E20 Fuel : अनेक वाहनचालकांनी E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड होत असल्याचा दावा केला होता. मात्र आता केंद्र सरकारने संसदेत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

संपूर्ण देशात इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलची चर्चा सुरू आहे. अनेक वाहनचालकांनी या इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड होत असल्याचा दावा केला होता. मात्र आता केंद्र सरकारने संसदेत या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. खासदार ए. ए. रहीम यांनी राज्यसभेत E20 इंधनाचा वाहनांवर होणाऱ्या परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, ‘E20 इंधनाच्या वापरामुळे वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड किंवा इंजिन निकामी झाल्याचे कोणतेही व्यापक अहवाल समोर आलेले नाहीत.’
सरकारने काय म्हटले?
खासदार ए. ए. रहीम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, IOCL, IIP, ARAI आणि SIAM यांच्या अभ्यासात E20 मुळे वाहनांच्या कार्यक्षमतेत मोठी घट आढळली नाही. BS-VI तसेच बहुतांश जुन्या वाहनांवरही E20 चा गंभीर विपरीत परिणाम दिसून आला नाही. मात्र 2005 ते 2016 दरम्यानच्या काही BS-III वाहनांमध्ये रबर पार्ट्स व गॅस्केट बदलण्याची गरज भासू शकते असं गडकरी यांनी कबूल केलं आहे.
वाहनाच्या मायलेजवर होणारा परिणाम हा केवळ इंधनामुळे नव्हे, तर वाहनाची देखभाल, टायर प्रेशर आणि ड्रायव्हिंग पद्धतीवरही अवलंबून असल्याच सरकारने सांगितलं आहे. त्याचबरोबर देशातील एथेनॉल मिश्रण 2013-14 मधील 1.53% वरून 2024-25 मध्ये सुमारे 19.2% पर्यंत वाढल्याची माहिती सरकारने दिली आहे. तसेच सोशल मीडियावरील E20 संदर्भातील अनेक दावे तथ्यहीन असल्याचं देखील सरकारने म्हटलं आहे.
E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आले
नीती आयोगाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतर-मंत्रालयीन समितीच्या शिफारशी आणि जून 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या रोडमॅप फॉर एथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया 2020-25 या अहवालाच्या आधारे देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. भारतामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 2013-14 मध्ये केवळ 1.53 टक्के होते. ते वाढून 2024-25 मध्ये सुमारे 19.2 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर E20 पेट्रोलबाबत व्यक्त केल्या जाणारे दावे तथ्यहीन आहेत. इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांची सुरक्षितता यांचा पूर्णपणे विचार करूनच ही धोरणात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.