E20 जनता पार्टीच्या टार्गेटवर केंद्रातील बडा नेता, थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; दोन दिवसात किती फॉलोअर्स वाढले ?
E20 जनता पार्टीने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलच्या (E20) धोरणाविरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. ग्राहकांना शुद्ध पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याचीही मागणी या संघटनेने केली आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून फॉलोअर्समध्ये मोठ्य़ा प्रमाणात वाढ झाली आहे.

देशातील NEET पेपरफुटीविरोधातील ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चं अनोख आंदोलन प्रचंड गाजलं. महिन्या-दीड महिन्याच्या लढ्यात असंख आंदोलक, तरूणाई जंतरमंतरवर तसेच देशताील विविध भागातही जमले आणि हे आंदोलन देशव्यापी ठरलं. अखेर तरूणाईच्या मागण्यांसमोर सरकार नमल्याचं चित्र दिसून आलं. शनिवारी धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हेच या आंदोलनाचं मोठं यश ठरलं. त्यानंतर सरकारने प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. CJP च्या आंदोलनाला मिळालेला भरघोस प्रतिसाद, त्याची देशातच नव्हे परदेशातही चर्चा झाली, अनेकांनी दखल घेतली. CJP च्या या अनोख्या आंदोलनानंतर आता आणखी एका नव्या संघटनेची चर्चा सुरू झाली आहे. ‘E20 जनता पार्टी’ या संघटनेने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाविरोधात मोहीम सुरू केली असून, ग्राहकांना शुद्ध पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली आहे. या पार्टीच्या निशाण्य़ावर एक मोठा, मराठी नेता आहे. शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची या पार्टीने मागणी केली आहे.
अवघ्या काही तासांतच ही पार्टी चर्चेत आली असून त्यांच्या फॉलोअर्समध्येही वेगाने वाढ होताना दिसत आहे. केवळ 24 तासांत E20 जनता पार्टीच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे. तर X ( पूर्वीच ट्विटर) वरही हा आकडा 30 हजारांच्या आसपास पोहोचल्याचे दिसून आलं.
नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी
संघटनेचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे CJP च्या आंदोलनाने मोठे लक्ष वेधले होते, त्याच धर्तीवर E20 जनता पार्टीने इंधन धोरणातील बदलांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. E20 जनता पार्टीने सरकारकडे पेट्रोल पंपांवर 100 टक्के शुद्ध (इथेनॉलमुक्त) पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणासाठी जबाबदार असल्याचा आरोप करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. गडकरी हे या पार्टीच्या निशाण्यावर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
वाहतूक क्षेत्रातील संघटनांचा पाठिंबा
या मोहिमेला काही वाहतूक संघटनांचाही पाठिंबा मिळत आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनने E20 पेट्रोलच्या विरोधात 4 ऑगस्ट रोजी संसद मार्च काढण्याची घोषणा केली आहे. E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचे मायलेज कमी झाले आहे, देखभालीचा खर्च वाढला आहे आणि विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे असा वाहतूक संघटनांचा दावा आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या काय ?
या पार्टीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्राम तसेच ‘X’ वर अल्पावधीत मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स मिळाले आहेत. आमचा उद्देश इथेनॉल-मिश्रित पेट्रोल पूर्णपणे बंद करण्याचा नाही , असं E20 जनता पार्टीने स्पष्ट केलं आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
ग्राहकांना शुद्ध पेट्रोल किंवा E20 पेट्रोल निवडण्याचा पर्याय मिळावा.
पेट्रोल पंपांवर इंधनाच्या प्रकाराची स्पष्ट माहिती आणि लेबलिंग असावे.
इथेनॉल मिश्रणामुळे होणारे फायदे, खर्च आणि परिणाम यासंबंधी सरकारने अधिकृत डेटा सार्वजनिक करावा.
वाहनांचे मायलेज, इंजिन कार्यक्षमता, प्रदूषण पातळी आणि देखभाल खर्चावर होणाऱ्या परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करण्यात यावा.
सध्या बाजारात कोणते पर्याय उपलब्ध ?
देशात इथेनॉलमुक्त 100-ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल उपलब्ध आहे, मात्र ते निवडक पेट्रोल पंपांवरच मिळते. या पेट्रोलची किंमत सुमारे 169 रुपये प्रति लिटर आहे. याउलट, दिल्लीमध्ये सामान्य E20 पेट्रोलची किंमत सुमारे 102.12 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
दरम्यान, इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या कामगिरीवर मोठा नकारात्मक परिणाम झाल्याबाबत सरकारकडे कोणत्याही व्यापक किंवा ठोस तक्रारी आलेल्या नाहीत, असं पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी संसदेत सांगितलं होतं.
E20 धोरणावरून आता ग्राहकांचा पर्याय, वाहनांची कार्यक्षमता आणि इंधन धोरणातील पारदर्शकता यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.