Anil Ambani : अनिल अंबानींना मोठा दणका, ईडीची मोठी कारवाई, तब्बल 510 कोटींची मालमत्ता जप्त!
अनिल अंबानी समूहाशी संबंधित कंपन्यांविरोधात ईडीने पुन्हा मोठी कारवाई केली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन, होम फायनान्स आणि कमर्शियल फायनान्सशी संबंधित प्रकरणांत 510 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर समूहाविरोधात जप्त केलेल्या मालमत्तेचा एकूण आकडा सुमारे 23,100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

मोठी बातमी समोर आली आहे. अनिल अंबानी समूहाला ED चा आणखी एक मोठा झटका बसला आहे. अनिल अंबानी समूहाच्या विविध कंपन्यांशी संबंधित प्रकरणात ED कडून आणखी 510 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन बँक फसवणूक प्रकरणात 247.12 कोटी, तर रिलायन्स होम फायनान्स (RHFL) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स (RCFL) प्रकरणात 263.05 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
RCOM प्रकरणात दोन चार्टर्ड विमाने, जमिनीचे सहा भूखंड आणि महाराष्ट्रातील एका कार्यालयीन जागेचा समावेश आहे. तर RHFL आणि RCFL प्रकरणात तामिळनाडूमधील दोन पवनचक्क्या, बँक खात्यातील शिल्लक, मुदत ठेवी, गुंतवणूक आणि येणे बाकी असलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. या ताज्या कारवाईनंतर अनिल अंबानी समूहाविरोधात ED ने आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेचा आकडा सुमारे 23,100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सार्वजनिक निधीचा अपहार, निधी परदेशातील टॅक्स हेवनमध्ये वळवणे आणि प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबीयांच्या वैयक्तिक फायद्यासाठी निधी वापरल्याचा ED चा तपासात आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये ED ने आतापर्यंत 10 जणांना अटक केली असून PMLA अंतर्गत 6 अभियोग तक्रारी आणि FEMA अंतर्गत एक तक्रार दाखल केली आहे. CBI दिल्ली, EOW दिल्ली आणि EOW मुंबईने दाखल केलेल्या विविध FIR च्या आधारे ED चा तपास सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात ईडीच्या तपासात आणखी कोणते खुलासे होणार, याकडे लक्ष लागले आहे.
का होत आहेत कारवाया?
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर दिवाळखोरीचा आरोप होत असून त्यांच्यावर सुरु असलेल्या या कारवायांमागे प्रामुख्याने गैरमार्गाने पैसा वळवणे आणि बँकांची फसवणून करुन कर चुकवणेव अशा स्वरुपाची महत्त्वाची कारणे सांगितले जातात. त्यामुळे ईडीने रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समुहाविरुद्ध अनेक कारवाया सुरु केल्या आहेत. हजारो कोटी रुपयांच्या त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत.
