
CJI On ED : ईडी तसेच इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील लोक विरोधकांवर सूड उगवतात असा दावा नेहमीच केला जातो. आता याच ईडीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. एका प्रकरणावर सुनावणी घेताना ईडी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
इडीने काही वकिलांना समन्स पाठवण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या आरोपींना वकिलांनी सल्ला दिला म्हणून हे समन्स जारी केले होते. या समन्सविरोधात संबंधित वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. याच प्रकरणावर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत आहे, अशी टिप्पणी केली. तसेच यासंदर्भात ईडीसाटी काही मार्गदर्शक सूचना असायला हव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं. सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची स्वत: दखल घेत सुनावणी घेतली होती.
ईडीच्या अशा भूमिकेमुळे वकिली पेशाची स्वतंत्रताही बाधित होईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. ईडीने वरिष्ठ वकील अरविंद दातार तसेच प्रताप वेणुगोपाल यांना समन्स जारी केले होते. याच समन्सविरोधात सरन्यायाधीशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘एक वकील आणि त्याच्या क्लायंटमधील संवादावरून नोटीस कशी दिली जाऊ शकते. ईडी सर्व मर्यादा ओलांडत आहे,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. तसेच अशा प्रकारच्या नोटिशी जारी झाल्या तर वरिष्ठ वकिलांच्या वकिलीवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या संदर्भात ईडीसाठी काहीतरी मार्गदर्शक सूचना असायला हव्यात, असे मत यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.
सरन्यायाधीशांच्या या टिप्पणीनंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या बाबीची दखल घेण्यात आली आहे. एखाद्याने फक्त कायदेशीर सल्ला विचारलेला असेल तर वकिलांना नोटीस पाठवू नका, असे ईडीला सांगण्यात आल्याचे यावेळी मेहता यांनी सांगितले.
तुषार मेहता पुढे म्हणाले की, कायदेशीर सल्ला दिला असेल तर वकिलांना नोटीस जारी केली जात नाही. ईडीची बदनामी व्हावी यासाठी अनेकदा चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. तसेच, माध्यमांत चालू असलेल्या वृत्तांचा आधार घेऊन न्यायालयाने ईडीविषयी मत तयार करू नये, अशी विनंतीही मेहता यांनी केली. यावर बोलताना हसत हसत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मी न्यूज पाहात नाही. मी यूट्यूबवर मुलाखतीही पाहात नाही. गेल्या आठवड्यात मी फक्त काही चित्रपट पाहिले आहेत, असे मिश्किल भाष्य केले.