
नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीत पुन्हा राजकीय घमासान रंगले आहे. दिल्ली सरकार दारु घोटाळ्यात अडचणीत सापडली आहे. एक एक करुन त्यांचे मोहरे तुरुंगात जात आहेत. आता आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभेचे सदस्य संजय सिंह (Rajya Sabha MP Sanjay Singh) हे अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ED Raid) त्यांच्या घरावर छापा टाकला. संजय सिंह यांचा बंगला दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू या भागात आहे. ही कारवाई सुरु असताना खासदार संजय सिंह यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा खडा पहारा सुरु आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्याची पाळंमुळं खणण्यासाठी ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर या कारवाईने वाद पेटण्याची शक्यता आहे.
दारु घोटाळ्यात दोषारोपपत्र
दारु घोटाळ्यात ईडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात तीन ठिकाणी संजय सिंह यांचे नाव आहे. सध्या त्यांच्या घरी ईडीचे अनेक अधिकाऱ्यांनी तळ ठोकला आहे. गेल्या एक तासापासून ही छापेमारी सुरु आहे. ईडीची टीम सकाळी 7 वाजताच संजय सिंह यांच्या घरी पोहचली. माहितीनुसार, संजय सिह यांना मंगळवारी रात्री तैवान येथे जायचे होते. याठिकाणी महिला सशक्तीकरण याविषयावर ते विचार मांडणार होते. पण त्यांचा हा दौरा होऊ शकला नाही. त्यांना परवानगी नाकारण्यात आली.
दोन सहकाऱ्यांच्या घरी पण धाड
खासदार संजय सिंह यांचे दोन सहकारी सर्वेश मिश्रा आणि अजित त्यागी यांच्या घरावर यापूर्वीच ईडीने धाड टाकली आहे. दारुचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांसोबत यांचे काय लागेबंध आहे, याची चौकशी ईडीने यापूर्वीच केली आहे. ईडी सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोन आरोपी राघव मगुंटा आणि दिनेश अरोडा हे साक्षीदार झाले आहेत. त्यानंतर आता ईडीने खासदार संजय सिंह यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.
आतापर्यंत तीन सरकारी साक्षीदार
मनी लॉड्रिंगप्रकरणात आरोपी राघव मगुंटा हा वायएसआर काँग्रेसचे खासदार मगुंटा श्रीनिवासुलू रेड्डी यांचा मुलगा आहे. तर याप्रकरणात कोर्टाने अरोडा याला सरकारी साक्षीदार करण्याची परवानगी दिली आहे. सध्या हे दोघे पण जामीनावर बाहेर आहेत. यापूर्वी अरबिंदो फार्माचे संचालक शरद रेड्डी हे सरकारी साक्षीदार झाले आहेत. म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत तीन सरकारी साक्षीदार झाले आहेत.