
अंलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन सट्टेबाजी अॅप प्रकरणात गूगल आणि मेटा (फेसबूक) यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही कंपन्यांनी सट्टेबाजी करणाऱ्या अॅपला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या जाहिराती घेतल्या, असा ईडीचा आरोप आहे. दोन्ही कंपन्यांना २१ जुलै रोजी चौकशीसाठी ईडीने बोलवले आहे.
ईडीचे म्हटले आहे की, गुगल आणि मेटाने ऑनलाइन बेटिंग अॅपच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्लॅटफॉर्म प्रदान केले होते. त्या प्रकरणांची सध्या मनी लाँड्रिंग आणि हवाला व्यवहारांसारख्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. या कंपन्यांवर या अॅपसाठी जाहिरातींचे स्लॉट दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या कंपन्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. या अॅपमुळे बेकायदेशीर कारवाया देशभर पसरू लागल्या आहेत. ईडीकडून उचललेल्या या पावलावरून आता तपास व्यापक प्रमाणात केला जात असल्याचे दिसत आहे. याआधीही अनेक चित्रपट कलाकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांची बेकायदेशीर बेटिंग अॅपला प्रोत्साहान दिल्याबद्दल चौकशी झाली आहे.
महादेव अॅप घोटाळा ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना या अॅपच्या प्रवर्तकांकडून ५०० कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा ईडीने केला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने प्रसिद्ध अभिनेते, टीव्ही होस्ट आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसह २९ जणांविरुद्ध या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांवर बेकायदेशीर बेटिंग अॅपला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. ईडीच्या एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये ज्या सेलिब्रिटींची नावे नोंदवली गेली आहेत, त्यात प्रकाश राज, राणा दग्गुबती आणि विजय देवरकोंडा या सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या अॅपच्या जाहिरातींच्या बदल्यात या लोकांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याचा आरोप आहे.