
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदी हे आपले चांगले मित्र आहेत, ते एक महान पंतप्रधान आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावना आणि संबंधांबद्दलच्या सकारात्मक भूमिकेंच मनापासून कौतुक करतो. भारत आणि अमेरिकेची सकारात्मक, भविष्याभिमुख, जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वादात भारतानं अतिशय संतुलित आणि परिपक्व भूमिका स्विकारली आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं आहे, याचा नेमका अर्थ काय? याबाबत तज्ज्ञांना काय वाटतं जाणून घेऊयात.
सध्या जी जागतिक स्थरावर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांसोबत संतूलित संबंध ठेवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चीनला असं वाटतं की भारतानं आपल्यासोबत येऊन भागिदारी आणखी मजबूत करावी, तर दुसरीकडे अमेरिका देखील भारताकडे व्यापारी संबंधांच्या दृष्टीकोणातून एक महत्त्वाचा देश म्हणून पहात आहे. अमेरिकेमधील कृष्टी उत्पादनाला भारतीय बाजारपेठेत एन्ट्री मिळावी यासाठी अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकण्याचं काम सुरू आहे, मात्र भारत ट्रम्प यांच्या या दबावाला जुमानताना दिसत नाहीये, आमच्या शेतकऱ्यांचं हीत हेच आमच्यासाठी सर्व प्रथम असेल अशी याबाबत भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तज्ज्ञांच्या मते अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. तर दुसरीकडे आता भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे. भारताची चीन आणि रशियासोबत वाढत असलेली जवळीक अमेरिकेसाठी धोक्याची घंटी ठरू शकते. अमेरिकेला आपलं संभाव्य नुकसान टाळायचं आहे, त्यामुळे एकीकडे अमेरिकेकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र दुसरीकडे त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना देखील दिसत आहेत.
नुकतंच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि अमेरिकी दूतावासाकडून देखील भारत आणि अमेरिकेमधील संबंध अधिक मजबूत बनले पाहिजेत यावर जोर देण्यात आला, तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे, मोदी हे माझे चांगले मित्र आहेत, ते एक सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.